दोन प्रभाग महिलांसाठी राखीव, दोनमध्ये कुणीही उतरा रिंगणात!

संग्रामपूर नगरपंचायतीची उरलेली लढतही रंगणार!!
 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १८ जानेवारीला होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी आज, २३ डिसेंबरला ४ प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात प्रभाग क्रमांक ११ व १६ हे दोन प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या उपस्‍थितीत झालेल्या विशेष सभेत आरक्षण जाहीर करण्यात आले.

सात वर्षीय लक्ष्मी अनिल वानेरे या मुलीने काढलेल्या चिठ्ठ्यांनंतर दोन प्रभाग महिला राखीव करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण वेळेवर रद्द केल्याने ८, १०,  ११, १६ या चार प्रभागांतील निवडणूक पुढे ढकलली होती. त्यामुळे २१ डिसेंबर रोजी या ४ प्रभागांची निवडणूक होऊ शकली नाही. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे चारही प्रभाग आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी सोडण्यात आले आहेत.

यातील २ प्रभाग आज सोडत पद्धतीने महिलांसाठी राखीव करण्यात आले. ८ व १० हे दोन प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने यात आता कोणीही निवडणूक लढवू शकते.  ११ व १६ ते दोन प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. १८ जानेवारीला होणाऱ्या या ४ प्रभागांच्या निवडणुकीसाठी २९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. १८ जानेवारी रोजी निवडणूक झाल्यावरच सर्वच १७ प्रभागांच्या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल.