खामगावात आकाश फुंडकरांना "कडवी" आव्हाने! सानंदांच्या एन्ट्रीमुळे लढत रंगतदार वळणावर! हिंदुत्ववादी मतदारही नाराज? फुंडकरांची होणार दमछाक....

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव विधानसभा मतदारसंघाची लढत यंदा रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. हिंदुत्ववादी नेते अमोल अंधारे यांनी अखेरच्या क्षणी घेतलेली माघार आकाश फुंडकर यांना थोडाफार दिलासा देणारी असली तरी "जो बुंदसे गयी वो हौद से नही आती" अशी अवस्था फुंडकर यांची झाली आहे. मुळात अमोल अंधारे यांना निवडणूक लढण्याचा निर्णय का घ्यावा लागला? हिंदुत्ववादी मतदारांना अपेक्षित असलेले काम फुंडकर यांच्याकडून झाले नाही का? अशा चर्चा आता खाजगीमध्ये सुरू झाले आहेत. त्यामुळे त्याचा फटका काही प्रमाणात का होईना फुंडकर यांना बसणार आहे.. दुसऱ्या बाजूला सलग तीन वेळा विधानसभेचे मैदान मारणारे तगडे पैलवान दिलीपकुमार सानंदा समोर असल्याने ही लढत फुंडकर यांना चांगलीच जड जाईल अशी चिन्हे दिसत आहेत...

 २०१४ आणि २०१९ अशी दोन वेळा निवडणूक जिंकणाऱ्या आकाश फुंडकरांना मधली अडीच वर्षे सोडली तर बहुतांश काळ सत्तेचा मिळाला. त्यामुळे सत्ताधारी पक्षात असताना साहजिकच त्यांच्याकडून मतदारांच्या अपेक्षाही तेवढ्याच वाढल्या होत्या. मात्र या अपेक्षांना फुंडकर खरे उतरले का? असा सवाल मतदार संघातील गावोगावच्या कट्ट्यांवर उपस्थित केला जात आहे. जिल्हाध्यक्ष या नात्यानेही फुंडकर यांना संघटनात्मक पातळीवर फारशी पकड बसवता आली नाही, त्यामुळे शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपचा कार्यकर्ता बोलत नसला तरी तो फुंडकरांच्या कार्यपद्धतीवर खुश आहे असे नाही.

दुसऱ्याबाजूला काँग्रेसने पुन्हा एकदा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासारख्या अनुभवी आणि तगड्या पैलवानाला मैदानात उतरवले आहे. सानंदा एका ब्रेक नंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरत असले तरी त्यांचा मतदारांवरील प्रभाव कमी झाला असे म्हणता येणार नाही. आकाश फुंडकर यांच्या तोडीस तोड नव्हे तर राजकीय कौशल्य वापरण्यात सानंदा फुंडकर यांच्यापेक्षा कणभर सरस ठरतील असे चित्र आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने फुंडकर निवडणुकीचा सामना करत आहेत ते पाहता ही लढत त्यांना अवघड जाण्याची चिन्हे आहेत...अर्थात प्रचाराचा काळ जसा जसा पुढे जाईल तसे चित्र अधिक स्पष्ट होईल...