रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस!काल एसडीओ, तहसीलदार येऊन गेले, तुपकरांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली!

पण तुपकर म्हणाले, अन्नाचा एक कणही घेणार नाही,आधी मागण्यांवर बोला, पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा....

 

सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर अन्नत्याग करीत आहेत. सोयाबीन - कापसाला भाव, पीकविमा, पिकांचा उध्वंस करणाऱ्या जंगली जनावरांचा बंदोबस्त यासह इतर मागण्या घेऊन सुरू झालेले हे आंदोलन व्यापक होण्याची चिन्हे आहेत. रविकांत तुपकर यांची हटके आंदोलनाची स्टाईल पाहता तुपकर आता पुढे नेमका काय पवित्रा घेणार याकडे शेतकऱ्यांसह प्रशासनाचे, पोलीस यंत्रणांचे देखील लक्ष लागून आहे.

त्यामुळे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

 याच प्रयत्नांचा भाग म्हणून काल सायंकाळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार, पीक विमा कंपनीचे अधिकारी रविकांत तुपकर यांना भेटायला आंदोलनस्थळी आले. आपण आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती अधिकाऱ्यांनी तुपकरांना केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही असे तुपकर यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यावेळी तुपकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने अधिकारीही निरुत्तर झाले. 
पीक विम्याच्या प्रश्नांवर तुपकरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. सरकारने पीक विम्याची अग्रिम रक्कम सर्व भरली आहे. मात्र तरीही पीक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पीक विमा कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा का दाखल करीत नाही? असा सवाल तुपकरांनी केला. या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते...