संविधानाचा जागर करण्यासाठी ॲड. वृषाली बोंद्रेही मैदानात! संविधान जागर यात्रेच्या ९ व्या दिवशी टाकळी, सातगाव म्हसला , बोदेगावात उस्फुर्त स्वागत! 

राहुल बोंद्रे म्हणाले, आता जनतेने निर्धार पक्का केलाय; मतदारसंघात दादागिरीचे साम्राज्य असल्याचा केला आरोप..
 
सातगाव म्हसला (अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संविधान आणि लोकशाही धोक्यात आणणारे केंद्र आणि राज्यातील सरकार आहे. सरकार सत्तेच्या नशेत गुंग आहे. डॉ.बाबासाहेबांनी आपल्या देशाला घटना आणि लोकशाही दिली. हजारो क्रांतिकारकांनी रक्त सांडल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र आता आपले स्वातंत्र्य देखील धोक्यात असून या देशावर हुकुमशाही लादण्याचा प्लॅन या मनुवादी सरकारचा आहे. मात्र संविधान जागर यात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यावरून या संविधान विरोधी सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार जनतेने पक्का केल्याचे दिसत आहे असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी संविधान जागर यात्रेच्या ९ व्या दिवशी टाकळी आणि सातगाव म्हसला येथे केले. संविधान जागर यात्रेत राहुल बोंद्रे यांच्या पत्नी तथा हिरकणी महिला अर्बन च्या अध्यक्षा वृषाली बोंद्रे यांनीदेखील सहभाग नोंदवला..
गेल्या २७ जानेवारीपासून सुरू असलेली संविधान जागर यात्रा चिखली विधानसभा मतदारसंघातील १०२ गावांत पोहचणार आहे. यासाठी ९ दिवसांचे नियोजन आधी करण्यात आले होते, मात्र गावागावात मिरणारा उस्फुर्त प्रतिसाद, ग्राम फेरी, गावोगावच्या सभा यामुळे निर्धारित गावांसाठी ११ दिवस लागणार आहेत. ६ फेब्रुवारीला ९ व्या दिवशी यात्रा करडी, कुंबेफळ, टाकळी, सातगाव म्हसला , म्हसला खुर्द, बोदेगाव या गावांत पोहचली. सर्वच गावांत गावकऱ्यांनी यात्रेचे दणक्यात स्वागत केले. यात्रेतील संविधानाच्या पालखीवर आणि यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्यावर जेसीबीने पुष्पवर्षाव करण्यात आला...
  मतदारसंघात दादागिरीचे साम्राज्य...
  संविधान पायदळी तुडवण्याचा प्रकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. जे दिल्लीत तेच स्थानिक पातळीवर मतदारसंघात देखील सुरू असल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी यावेळी केला. भाजपात पक्षप्रवेश करून घेण्यासाठी दादागिरी आणि दमदाटी करण्यात येत असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. जे भाजपात जाणार नाही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात असा आरोपही राहुल बोंद्रे यांनी कुणाचे नाव न घेता केला.