असा आहे चिखलीचा नवा ऑक्सिजन प्लांट!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात ९० लक्ष रुपये खर्चून ऑक्सिजन जनरेशन प्लांट पूर्णत्वास आला आहे. आमदार श्वेताताई महाले यांच्या अथक प्रयत्नांमुळे चिखली उपजिल्हा रुग्णालय आता प्राणवायूबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. प्लांटची पाहणी नुकतीच आ. महाले पाटील यांनी करून समाधान व्यक्त केले. या प्लांटमधून रोज ८० ते १२० जंबो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. ही ऑक्सिजन निर्मिती हवेतून होणार असल्याने किरकोळ खर्चातून रोज मोठ्या प्रमाणात मोफत प्राणवायू मिळून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्या अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी ऑक्सिजन मिळत नसल्याने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करावी, अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी २२ जून २०२१ ला पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. चिखली येथे उपजिल्हा रुग्णालयात समर्पित कोविड हेल्थ सेंटरला सुद्धा आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने मान्यता मिळालेली असून, उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीची दुरुस्ती करून त्याठिकाणी कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याच ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये याकरिता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा ऑक्सिजन प्लांटला सुद्धा मान्यता देण्याची मागणी आ. श्वेताताई महाले यांनी त्यावेळी केली होती.
प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय ऑक्सिजन संदर्भात स्वयंपूर्ण होत असताना चिखली येथे ऑक्सिजन प्लांटला मान्यता न दिल्याने चिखली शहर परिसरातील नागरिकांवर तथा रुग्णांवर अन्याय केल्याची भावना निर्माण होत असल्याची बाब ही आ. सौ. श्वेताताई महाले यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे बोलून दाखविली होती. त्याचवेळी पालकमंत्र्यांनी चिखली येथे ऑक्सिजन प्लांट देण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने आ. महाले पाटील यांच्या प्रयत्नाने कोविड हेल्थ सेंटर आणि ऑक्सिजन प्लांट या दोन्ही कामांना मान्यता मिळाल्याने चिखली शहराच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही कामे मैलाचा दगड ठरणार आहेत. या वेळी भाजपा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, भाजपा शहराध्यक्ष पंडित देशमुख, उपाध्यक्षा सौ. वजीराबी शेख अनिस, सभापती विजय नकवाल, रुग्ण कल्याण समिती सदस्य नामु गुरुदासानी, नगरसेवक सुभाष अप्पा झगडे, गोविंद देव्हडे, सौ. अर्चनाताई खबूतरे, संजय अतार, अनुप महाजन, शैलेश बाहेती, पंजाबराव धनवे, शैलेश सोनुने, घनश्याम बंग, रघुनाथ कुलकर्णी, सुदर्शन खरात, सागर पुरोहित आदी उपस्थित होते.