"या' आमदारांनी शेतकऱ्यांना दिलाय मोठा संदेश!

प्रत्‍येक शेतकऱ्याने वाचावा असा संदेश..!!
 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुख- दुःख मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि संघर्ष हा त्यावरचा उपाय. जो संघर्ष करेल तोच जीवनाची लढाई जिंकेल. त्यामुळे जिंकण्यासाठी लढत राहिले पाहिजेत. कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय नसून, संघर्ष हाच जीवनाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले. निमित्त होते ते दिवाळीनिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटपाचे. हा उपक्रम सहा दिवसांपूर्वी राबविण्यात आला असला तरी आ. महाले पाटील यांनी या फराळासोबत दिलेले भावनिक पत्र मात्र आता व्हायरल होत आहे. त्‍यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शाब्दिक आधार दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे आ. सौ. श्वेताताई महाले पाटील अध्यक्ष असलेल्या तोरणा महिला अर्बन पतसंस्था आणि आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना आणि कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना फराळाचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना फराळासोबत कपडेसुद्धा देण्यात आले. "जगण्याला सांगा हरायचे नाही... संघर्षाला कधीच घाबरायचे नाही, ध्येयात हिमालय जरी आड आला... त्याचा चुरा केल्याशिवाय थांबायचे नाही... मी तुमचे दुःख वाटून घेऊ शकत नाही. परंतु आपल्या दुःखात निश्चितच सहभागी आहे. आपणास भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करून ते हलके करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन, असे सांगून आ. महाले पाटील यांनी शेतकरी कुटुंबियांना आश्वस्त केले आहे.