बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. तत्कालीन संपुआ सरकारने देशाला लावलेली भ्रष्टाचाराची कीड संपलेली आहे. पारदर्शक कारभार म्हणजे काय असते हे मोदींनी दाखवुन दिले. जनहिताच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळत आहे, कुठेही कमिशनखोरी, दलाली नाही. "ना खाऊंगा ना खाने दुंगा" या मोदींच्या घोषणेमुळे विरोधकांचे धंदे बंद झाल्याने १० वर्षांपासून त्यांच्या पोटात दुखत आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात हजारो कोटींची कामे झाले आहेत, एकही गाव असे नाही जिथे केंद्र सरकार,राज्य सरकारच्या माध्यमातून कामे झाले नाहीत. त्यामुळे विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत, ते व्यक्तिगत पातळीवर टिका करतील, पण इथे आपल्यासमोर कोणताही प्रभावी उमेदवार नाही त्यामुळे आपला बुलडाणा लोकसभा मतदारसंघात विजय निश्चित आहेच, शिवाय पंतप्रधान मोदींचा ४०० पारचा नारा देखील पूर्ण होणार आहे असे प्रतिपादन खा.प्रतापराव जाधव यांनी केले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ लोकसभा क्षेत्रातील ६ विधानसभांमध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी चिखली बुलडाणा येथील प्रचारकार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खा.जाधव बोलत होते.
यावेळी खा.जाधव यांनी उपस्थित सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. निवडणूक प्रचाराची रितसर सुरूवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रचार करायचा असल्याने तब्येतीची देखील काळजी घेण्याच्या सूचना यावेळी खा.जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने जनहिताच्या जेवढ्या योजना १० वर्षात राबवल्या त्याच्या अर्ध्या योजनाही काँगेसच्या ५० वर्षात राबवल्या गेल्या नाहीत. केंद्रातून १ रुपया आला तर लाभार्थ्याला १ पैसा मिळत होता, मधले ९९ पैसे गायब व्हायचे. मात्र आता केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळतो. अल्पसंख्यांक, मागासवर्गीय ,शेतकरी, विद्यार्थी, कामगार , महिला या समाजाच्या विविध घटकांसाठी अनेक योजना केंद्र सरकारने राबविल्या आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील जनतेचा विश्वास आता १०० पटीने वाढल्याचे खा.जाधव म्हणाले. यावेळी त्यांनी प्रचाराच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
मेहकर येथील प्रचारकार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी खा.जाधव यांच्यासमवेत आ.संजय रायमुलकर, देऊळगाव राजा येथे आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी आ.शशिकांत खेडेकर, माजी आ.तोताराम कायंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, डॉ.सुनील कायंदे, चिखली येथे आ. श्वेताताई महाले पाटील, विजय कोठारी, सुरेशआप्पा खबुतरे, बुलडाणा येथे आ.संजय गायकवाड, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक, माजी आ.विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे ,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.