बुलडाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नाही, गुंडशाही आहे!
आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा! काँग्रेस नेत्या जयश्री शेळकेंची मागणी; मॅटर काय? वाचा...
Sep 16, 2024, 12:41 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही आहे असा घणाघात करीत आ. संजय गायकवाड यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेत्या जयश्री शेळके यांनी केली आहे. आज ,आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करीत असल्याचे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा जयश्री शेळके यांनी समाचार घेतला.
आ. गायकवाड यांचे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांची भूमिका वारंवार लोकशाही आणि आरक्षण विरोधाची राहिली आहे. हे देशातील जनतेला माहीत आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी सातत्याने जातीय जनगणना व्हावी अशी मागणी रेटून धरत आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतलेली आहे.आ.गायकवाड यांनी याआधी दलीत बांधवांच्या विरोधात काय वक्तव्य केले आहे हे मतदारसंघातील जनतेला माहीत आहे.आ. संजय गायकवाड वारंवार चिथावणी खोर वक्तव्य करण्यात माहित आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सौ.शेळके यांनी केली आहे.