शेतकरी मोचार्त दिसली महाविकास आघाडीची एकजूट! चिखलीत कृषी अधिकारी कार्यालयाला घेराव; राहुल बोंद्रे सरकारवर बरसले; म्हणाले देशात लोकशाही फक्त कागदावर; सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण!

एकदा जेलची हवा खाऊन आलोय, त्यामुळे कितीही गुन्हे दाखल करा तरी शेतकऱ्यांसाठी लढणारच म्हणाले..!

 
चिखली(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आकाशात फडकणारे उंचच उंच काँग्रेस अन् महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचे झेंडे,  सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी, बैलगाड्यांच्या आणि ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा,  हजारो शेतकऱ्यांच्या मोर्चाभोवती चालणारे शेकडो पोलीस आणि त्यात   दफड्यांचा निणादणारा आवाज...हे चित्र होते आज,२७ मार्चला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखलीच्या कृषी अधिकारी कार्यालयावर निघालेल्या घेराव मोर्चाचे..चिखली तालुक्यातील हजारो शेतकरी आणि महिला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात या घेराव आंदोलनात सहभागी झाल्या  होत्या. बोंद्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळून निघालेला घेराव मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, बसस्टँड, डॉ. गुप्ता हॉस्पिटल या मार्गे  तहसील कार्यालयाजवळून तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडकला. चिखलीचे तापलेले राजकीय वातावरण पाहता जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, दंगाकाबू पथक, अतिरिक्त पोलिस कुमक चिखलीत तैनात करण्यात आल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात मोर्चात सहभागी शेतकऱ्यांना, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी राहुल बोंद्रे राज्य आणि केंद्र सरकारवरच चांगलेच बरसले. हे जुमल्यावाल्यांचे सरकार आहे, खोक्यावाल्यांचे सरकार आहे. शेतकरी मेला तरी त्यांना काही फरक पडत नाही.देशात लोकशाही फक्त कागदावर आहे, प्रत्यक्षात नरेंद्र भाई आणि अमित भाईंची हुकूमशाही सुरू आहे. इडी, सीबीआयचा गैरवापर दाखवून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे लोन आता दिल्लीतून गल्लीत आले. माझ्यावरही दरोड्याचे गुन्हे दाखल केले. पण लक्षात ठेवा, मी जेलची हवा खाऊन आलोय.. त्यामुळे तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा, शेतकऱ्यांसाठी मी लढतच राहणार असा घणाघात राहुल बोंद्रेनी यावेळी केला.
 

घेराव मोर्चात विधान परिषद आमदार धिरज लिंगाडे, बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज दांडगे, ज्योतीताई खेडेकर, कुणाल बोंद्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख किसन धोंडगे, सचिन बोंद्रे, बाळू साळोख, बिदेसिंग सोळंकी, सत्येंद्र भुसारी यांच्यासह काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाविकास आघाडीच्या घटकपक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 पुढे बोलतांना राहुल बोंद्रे म्हणाले की,  जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सरकारच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. रात्रीचा दिवस आणि रक्ताचे पाणी करूनही त्याच्या हातात काही येत नाही. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र पंतप्रधान झाल्यानंतर सगळे आश्वासन ते सोयीस्कररित्या विसरले. अमित शहा तर त्याला जुमला म्हणतात. एवढा बेशरमपणा त्यांनी केल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला. पीक विमा काढा असे स्वतः पंतप्रधान म्हणाले होते. शेतकऱ्यांनी विमा काढला. मात्र  यंदा अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी केल्या. कंपनीने पंचनामे करण्यासाठी त्यांची माणसे पाठवली मात्र पंचनामे करणाऱ्या कंपनीच्या माणसांनी सुद्धा शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले मात्र मिंधे सरकारच्या पोलिसांनी शेतकऱ्यांच्या पाठीवर वळ उमटवले. हे सरकार व्यापाऱ्यांचे आहे, अदाणी, अंबानींचे आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना या सरकारने देशद्रोही आणि नक्षलवादी ठरवले. या सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण असल्याचा हल्लाबोल यावेळी बोंद्रे यांनी केला.


    
सरकारने शेतमालाचे भाव पाडले.

या सरकारने व्यापाऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले. वायदे बाजार बंद केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी केंद्र सरकारने कापसाच्या ३ लाख गाठी ऑस्ट्रेलियातून आयात केल्या आणि कापसाचे भाव पाडले. शेतकऱ्यांचा गहू मार्केट मध्ये यायच्या आधी शेतकरी विरोधी सरकारने बफर स्टॉक मधील ५० लाख टन गहू बाजारात आणला आणि गव्हाचे भाव पाडले. सोयापेंड आणि तेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी सरकारने प्रवृत्त केले असाही आरोप बोंद्रे यांनी केला.
     
आपली भीती वाटत असल्याने खोटे गुन्हे..!

    हे सरकार इडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. राहुल गांधींची केंद्र सरकारला भीती वाटत आहे आणि चिखली विधानसभा मतदारसंघातील विरोधकांना माझी भीती वाटत आहे. मी शेतकऱ्यांसाठी लढत आहे आणि त्यामुळेच आपल्याविरोधात गुन्हे दाखल केल्याचा दावाही बोंद्रे यांनी केला. याआधीही आपल्यावर गुन्हे दाखल होऊन आपल्याला व आपल्या सहकाऱ्यांना अटक झाल्याची आठवण बोंद्रे यांनी यावेळी सांगितली.यानंतर देखील माझ्यावर गुन्हे दाखल होतील याची मला कल्पना आहे असेही ते म्हणाले. आता तुम्ही गुन्हे दाखल करता करता थकता की मी गुन्हे अंगावर घेता घेता थकतो हे पाहून घेऊ. मी याआधी देखील जेलची हवा खाऊन आलोय त्यामुळे मला त्याची भीती नाही. शेतकऱ्यांसाठी लढतच राहणार असेही राहुल बोंद्रे म्हणाले.
    
 जो डर गया वो मर गया: हर्षवर्धन सपकाळ!

    जो डर गया वो मर गया, अती तिथे माती म्हणत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वऱ्हाडी शैलीत भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधानांचे आडनाव आता मोदानी झाल्याचे ते म्हणाले. देशातील लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही गेली तर ठोकशाही येईल अन पायातील खेटर पुन्हा बहुजनांच्या गळ्यात येतील असे सपकाळ म्हणाले. देशाचा पंतप्रधान कंपन्यावाल्यांचा दोस्त आहे. त्या दोस्तांना फायदा मिळवून द्यायचा असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. हे सगळ विचारणार हे माई का लाल दिल्लीत आहे. त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची खासदारकी रद्द केली पण देशातील करोडो जनतेचा आशीर्वाद राहुल गांधींना असल्याने त्यांचा आवाज दबणार नाही. मुक्या आणि बहिऱ्या सरकार विरोधात हम लढेंगे असे म्हणत सपकाळ यांनी भाषणाचा समारोप केला.

  खोकेबाज सरकार खोटे बोलते: आ. धिरज लिंगाडे

    देशात आणि राज्यात खोकेबाज सरकार आहे. हे सरकार गतिमान असल्याचा प्रचार करते मात्र यांची गती शून्य आहे. शेतकरी मर मर मरतो मात्र शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर यायला मंत्र्यांना वेळ नाही. सुशिक्षित बेरोजगारांना मिळणारे काम हिसकावून आता खाजगीकरण करण्याचा कुटील डाव या सरकारने रचला आहे. हे भांडवलदारांचे सरकार आहे. केवळ मोजक्या लोकांचे लाड हे सरकार करीत आहे. सरकारने लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे दिले नाही तर मोठे आंदोलन छेडणार असल्याचे विधानपरिषद आमदार धिरज लिंगाडे यावेळी म्हणाले. पीक विमा कंपनीचे पैसे अदानी अंबानीच्या घशात जात असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी यावेळी केला.तर हे सरकार दळभद्री असून शेतकऱ्यांची कुचेष्टा या सरकारने लावली असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख किसन धोंडगे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हातातील पोस्टर ठरले लक्षवेधी..!

  घेराव मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या हातातील पोस्टर यावेळी लक्ष वेधून घेत होते. महागाई, अतिवृष्टी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा या विषयांवर भाष्य करणारे पोस्टर शेतकऱ्यांच्या हातात व बैलगाड्या आणि ट्रॅक्टर वर लावण्यात आले होते.  " हे ही दिवस सरतील, विश्वास ठेव, बा शेतकऱ्या..तू एकटा नाहीस, महाविकास आघाडी तुझ्यासोबत आहे!" तसेच लो रखो अपना अच्छे दिन वाला सिलेंडर..मुझे बुरे दिन वाला ही सिलेंडर दो..!" असा मजकूर लिहिलेले पोस्टर लक्ष वेधून घेत होते.