बुलडाणा विधानसभा मतदारसंघात निष्ठेची मशाल पेटली! गावोगावी मिळतोय तुफान प्रतिसाद; जिल्हाप्रमुख बुधवंत म्हणाले,महाभ्रष्टाचारी सरकारचे दिवस कमी राहिलेत...

 
मोताळा (अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष जनमानसात आहे. शेतकरी, युवक, नोकरदार वर्ग कुणीही राज्य सरकारच्या कामकाजावर खुश नाही. सरकार केवळ उद्योगपतींचे लाड करत आहेत, सगळे उद्योग गुजरात मध्ये पळवण्याचा घाट या सरकारने घातला आहे. जनता केवळ संधीची वाट पाहत आहे, विधानसभा निवडणुकीत हा सरकारविरोधातील असंतोष ,आक्रोश मतपेटीतून बाहेर पडेल त्यामुळे आता या महाभ्रष्टाचारी सरकारचे कमी दिवस राहिलेत असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी केले. ९ सप्टेंबर रोजी मशाल यात्रेच्या पाचव्या दिवशी दाभाडी येथे आयोजित एका कॉर्नर बैठकीत ते बोलत होते.

 ५ सप्टेंबर पासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर यांच्या नेतृत्वात मशाल यात्रा सुरू आहे. २३ सप्टेंबरला बुलडाण्यात होणाऱ्या विराट आक्रोश मोर्चा ने या मशाल यात्रेचा समारोप होणार आहे. या आक्रोश मोर्चाला खा.अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संबोधित करणार आहेत. या आक्रोश मोर्चाचे निमंत्रणही मशाल यात्रेदरम्यान देण्यात येत आहे. 

मशाल यात्रेचा आज ६ वा दिवस...

  ५ सप्टेंबरला मोताळा येथून ही मशाल यात्रा प्रारंभ झाली.गावोगावी मिळणारा प्रचंड प्रतिसाद, फटाक्यांच्या आतषबाजीने होणारे स्वागत यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. आज,१० सप्टेंबरला या यात्रेचा ६ वा दिवस आहे. खामखेड, दाभा, नाईकनगर, नळकुंड, उबाळखेड, गुळभेली, रोहिणखेड, काळेगाव,तपोवन, सारोळापीर,
सारोळा मारोती आणि थड या गावांत आज मशाल यात्रा पोहचणार आहे.