खामगाव तालुक्यात गुंजणार परिवर्तनाचा निनाद! वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा उद्यापासून खामगाव तालुक्यात; महिला मेळाव्याने होणार सुरुवात

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीची गाजत असलेली परिवर्तन रथयात्रा आता उद्या, १ मार्चपासून खामगाव तालुक्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील ८० गावांत ही रथयात्रा पोहचणार असून रथयात्रेची सुरुवात उद्या दुपारी खामगाव शहरात होणाऱ्या महिला मेळाव्याने होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या गुरुद्वारा हॉल, काँग्रेस भवन येथे हा महिला मेळावा होणार आहे.
 
                    Add
जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक दूर करण्यासाठी संदीप शेळके यांनी वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीची सुरुवात केली. आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय परिवर्तन करण्यासाठी संदीप शेळके यांनी कंबर कसली आहे. १० फेब्रुवारीपासून मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून परिवर्तन रथयात्रा सुरू केली. गेल्या १९ दिवसांत मोताळा, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील गावोगावी पोहचून संदीप शेळके यांनी परिवर्तनाची साद घातली. तिन्ही तालुक्यांत या यात्रेचे दमदार स्वागत झाले, तीन तालुक्यातील अभूतपूर्व प्रतिसादानंतर ही रथयात्रा आता खामगाव तालुक्यात येत आहे. महिला मेळाव्याने प्रारंभ झाल्यानंतर खामगाव शहरातील विविध चौकांत संदीप शेळके जनतेशी संवाद साधत कॉर्नर मीटिंग घेणार आहेत.
   खामगावात येथे होणार कॉर्नर सभा..
  खामगाव शहरातील गांधी चौक, मस्तान चौक, जय भवानी चौक, चांदमारी चौक, टॉवर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, फरशी चौक, मेहबूब नगर, शंकर नगर, बाळापूर फैल या भागात वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके जनतेशी संवाद साधणार आहेत.
जिल्हाभर वन बुलडाणा मिशनची चर्चा..
लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर संदीप शेळके यांनी वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक संवाद मेळावे घेतले. २२ जानेवारीला श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संतनगरी शेगाव ही श्रीराम वंदना यात्रा देखील चांगलीच गाजली. त्यानंतर ३ फेब्रुवारीला बुलडाण्यातील साईकृपा लॉन वर झालेल्या बूथ कमिटी सदस्यांच्या मेळाव्यातच मायबाप जनतेने संधी दिल्यास खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करणार असल्याचे सांगत शेळके यांनी जिल्ह्यात परिवर्तन रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती.
दरम्यान ठरलेल्या नियोजनाप्रमाणे या रथयात्रेला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे.गावोगावी संदीप शेळके यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. संदीप शेळके देखील फ्रंटफूटवर येऊन जिल्ह्याच्या मागासलेपणाला जबाबदार कोण? जिल्ह्याचा विकास कशामुळे खुंटलाय? असे सवाल उपस्थित करून थेट प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना फैलावर घेत आहेत. जनतेने लोकसभेत संधी दिल्यास कमिशनराज, गुंडाराज संपवणार असल्याचे संदीप शेळके ठणकावून सांगत आहेत. एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणात वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेने जिल्ह्यातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे.