दडपशाही मार्गाने सत्तेची मस्ती दाखवणाऱ्यांच्या पापाचा घडा भरतोय! जयश्रीताईंचे खडे बोल; मोताळा तालुक्यात गाव भेट दौऱ्याला उदंड प्रतिसाद..

 
  
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रात आणि राज्यात दडपशाही मार्गाने सरकार सुरू आहे. आया बहिणींची अब्रू लुटली जाते, मात्र मुर्दाड सरकारला काही देणे घेणे नाही.लाडकी बहीण योजनेच्या आड पापे झाकल्या जाणार नाही. सरकारी योजना ह्या जनतेच्या पैशातून सुरू आहेत,त्यामुळे उपकाराची भाषा महायुतीवाल्यांनी करू नये. दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत दडपशाही मार्गाने सत्तेची मस्ती दाखवणाऱ्यांच्या पापाचा घडा भरत आला आहे.२० नोव्हेंबरला मतपेटीतून जनता उत्तर देईल.२३ नोव्हेंबरला यांना तोंड दाखवायला देखील जागा शिल्लक उरणार नाही असे खडे बोल बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी सुनावले आहेत. आज,४ नोव्हेंबरला मोताळा तालुक्यातील बोरखेड, कोमलवाडी, तारापुर, तरोडा, कोथळी, इब्राहिमपूर या गावांत जयश्रीताई शेळके यांचा गाव भेट दौरा संपन्न झाला यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या.
 बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नावाने केवळ गाजर दाखवण्यात आल्याचा आरोप ही त्यांनी केला. एकीकडे मूलभूत प्रश्न सामान्य माणसांना भेडसावत असताना केवळ जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचे काम सुरू आहे. "हम करे सो कायदा" ही वृत्ती इथल्या लोकप्रतिनिधींची आहे. सत्तेच्या बळावर कायदा पायदळी तुडवण्याची त्यांची हिम्मत वाढली आहे..मात्र आता सामान्य माणूस त्यांना एकजुटीची ताकद दाखवून देईल..केवळ बुलढाणा विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर राज्यात आता क्रांतीची मशाल पेटणार आहे असेही जयश्रीताई यावेळी म्हणाल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, काँग्रेसचे नेते गणेशसिंग राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..