शेतीचे विज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर! विकसित कृषी संकल्प यात्रा ; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आज केळवद येथे शेतकऱ्यांशी साधणार संवाद....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतीचे विज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विकसित कृषी संकल्प यात्रा या अभियानात आता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे. या अभियानांतर्गत आज, ९ जून रोजी चिखली तालुक्यातील केळवद येथे सकाळी १० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

या अभियानाद्वारे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला; कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा यांचे शास्त्रज्ञ आणि कृषी व आत्मा विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात येऊन शेतीसंबंधित मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सुधारित लागवड पद्धती, मृदा परीक्षणाचे महत्त्व, ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सल्ला, प्रयोगशाळेतील संशोधन आणि तांत्रिक मार्गदर्शन या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या यात्रेमागे आहे.
हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा; आत्मा (बुलढाणा) आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.