सत्ताधाऱ्यांनी रडीचा डाव खेळला! जालिंधर बुधवंत असेल किंवा नसेल पण सभापती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच होईल! अर्ज नामंजूर झाल्यानंतर जालिंधर बुधवंतांची प्रतिक्रिया! म्हणाले,निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव..

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)बाजार समितीत डोळ्याने दिसतील अशी न भूतो विकास कामे केली आहेत. मी उमेदवार नसलो म्हणजे शिवसेनेचा कुठला उमेदवार नसेल, असे नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकण्याची शक्यता कुठेच दिसत नसल्याने विरोधकांनी सत्तेच्या बळाचा दुरुपयोग केला. दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले. वास्तविक पाहता अर्जात कुठलीच त्रुटी नसतानाही कुणाच्या हातच्या बाहुले बनलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज नामंजूरचा निर्णय घेतला, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या निर्णयाला आम्ही जिल्हा उपनिबंधकांकडे आव्हान दिले असून, तेथेही न्याय न मिळाल्यास आम्हाला न्यायालयाची दारे  उघडीच आहेत, असेही बुधवत यांनी विरोधकांना बजावले.सहकाराच्या निवडणुकीत पद्धतशीर राजकारण केले जात असल्याचा प्रत्यय सध्या बुलढाणा बाजार समितीत आला आहे. शिंदे गट आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे जालिंदर बुधवत, राजू मुळे, सुधाकर आघाव, सुनील गवते, रखमाबाई पिंपळे यांच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, श्रीकांत पवार, धनंजय बारोटे तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष अड. सुनील देशमुख, अड. मोहन पवार आणि संदीप उगले यांनी आक्षेप घेतला. त्यांचे अर्ज नामंजूर झाले. या प्रकरणातील तथ्याबाबत जालिंदर बुधवत यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.

यावेळी बुधवंत म्हणाले की, अर्जासोबतच सहा महिन्यांआधी व्यापारी म्हणून असलेले माझे लायसन्स रद्द केल्याचा पुरावा जोडला होता. त्याबाबत बाजार समितीच्या ठरावाची प्रतही अर्जासोबत जोडली होती. रितसर सगळे पुरावे जोडल्यानंतरही मतदारयादीत नाव कसे आले? हे जिल्हा उपनिबंधक व तत्सम प्रशासनाने ठरवावे. त्यात आमचा काय दोष? जिल्हा प्रशासनाकडून मागच्या महिन्यात किंवा आधीदेखील काही मृत अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे बदल्यांच्या यादीत आली होती. त्याला दोषी कोण होते? असे प्रकार होत असतात. मात्र, अर्ज छाननीच्या वेळेस नियम, कायदा मोडीत काढून कोणाच्यादबावात अधिकाऱ्यांनी अर्ज रद्द केला, हा खरा संशोधनाचा विषयआहे. या विरोधात आम्ही रितसर अपील दाखल केले आहे.
न्यायासाठी आमचा लढा सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. 

लोणारमध्ये अर्ज मान्य, बुलढाण्यातच वेगळा न्याय कसा ?

लोणारात उरफाटा न्याय केल्याचे सांगत बुधवत म्हणाले, लोणार येथील बाजार समिती निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या बळीराम मापारी नावाच्या उमेदवाराचे व्यापारी व सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरण्यात आले होते. शिवसेनेने आक्षेप घेतल्यानंतरही तेथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मापारी यांचा व्यापारी मतदारसंघातील अर्ज रद्द ठरवला, पण त्याचवेळी सोसायटीमधील अर्ज कायम ठेवला. लोणार येथे वेगळा कायदा आणि बुलढाण्यात वेगळा कायदा आहे का? जिल्हा उपनिबंधकांनी तालुकास्तरावर नेमलेल्या अधिकाऱ्यांना वेगळे अधिकार दिले आहेत काय? बुलढाण्यात माझ्या अर्जासोबत लायसन्स रद्द केल्याची सहा महिन्यापूर्वीच पोच आणि बाजार समितीचा ठराव हे दोन्ही पुरावे सोबत जोडलेले असताना अर्जच बाद करण्यात आला, हे कसे काय होऊ शकते. माझा तर एकाच मतदारसंघात अर्ज होता, मग बुलढाण्यात वेगळा न्याय काय? यासाठी कुणाचा दबाव होता? असा प्रश्न बुधवत यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला.

सभापती शिवसेनेचाच होईल..!

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संयमाने आम्ही काम करतोय. शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मीच उमेदवार असलो पाहिजे, असे नाही. मासरूळ हा जिल्हा परिषदेचा शिवसेनेचा गड आहे. त्या मतदारसंघात मी फक्त एकवेळ निवडणूक लढवली, तीदेखील माझी अर्धांगिनी त्या ठिकाणी महिला राखीव असल्याने लढली.त्याआधी जेही उमेदवार उभे केले, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेना म्हणून आमचीच होती. त्यामुळे आता या बाजार समितीच्या निवडणुकीत समोरासमोर लढायची हिंमत नसल्याने अशा आडकाठी आणत विरोधकांनी रडीचा डाव खेळला आहे. जालिंधर बुधवंत  उमेदवार असेल किंवा नसेल,पण सोबत असलेली महाविकास आघाडी जिंकणार आणि शिवसेनेचाच सभापती होईल, ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा दावाही जालिंदर बुधवत यांनी यावेळी केला..
याप्रसंगी माजी सभापती सुधाकर आघाव, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, सुनील गवते, राजू मुळे, विजय इतवारे, गजानन उबरहंडे, जिल्हा प्रवक्ता गजानन धांडे उपस्थित होते.