कारवाईचा आ'सूड'!; जिल्हाभरातील भाजप आमदारांविरुद्ध गुन्हे दाखल
चिखलीत आ. श्वेताताईंविरुद्ध गुन्हा दाखल
चिखलीत आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने आसूड मोर्चा काढला होता. मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी व महिला सहभागी झाल्याने कोरोनाविषयक नियमांचा भंग झाला. त्यामुळे आ. सौ. महाले पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडित देशमुख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, बुलडाणा भाजप तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, सुधा काळे, शमशाद पटेल, द्वारकाबाई भोसले, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शिनगारे, शेख अनिस यांच्यासह इतर ४ ते ५ जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे. पो.काँ. पंढरी मिसाळ यांनी या सर्वांविरुद्ध तक्रार नोंदवली.
खामगावात ॲड. आकाश फुंडकरांविरुद्ध गुन्हा
काल खामगाव येथे आसूड मोर्चा काढण्यात आला. जमावबंदी व कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून आमदार आकाश फुंडकर, नरेंद्र रोहनकार, आशिष सुरेखा, विनोद टिकार, ज्ञानदेव मानकर, जितेंद्र पुरोहित, संतोष येवले, सुनील वानखेडे यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जामोदमध्ये आमदार संजय कुटे यांच्याविरुद्ध गुन्हा
काल जळगाव जामोद येथेही उपविभागीय कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी आमदार संजय कुटे, अभिमन्यू मोतीराम भगत, सचिन जानराव देशमुख, नंदकिशोर रतनलाल अग्रवाल, प्रकाश बगाडे, मांगीलाल भुसारी, गजानन सरोदे, लोकेश राठी, प्रफुल ऊर्फ श्याम मधुकर आकोटकर यांच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मलकापुरात माजी आमदार चैनसुख संचेतींविरुद्ध गुन्हा
मलकापूर येथेही काल आसूड मोर्चा काढण्यात आला होता. मलकापूर शहर पोलिसांनी माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा तालुकाध्यक्ष संजय सदाशिव काजळे, भाजपा शहराध्यक्ष मिलिंद डवले, डॉ. योगेश पाटणी, संतोष बोंबटकार, मोहन शर्मा, बलदेव चोपडे यांच्यासह इतरांवर पो.काँ. मनोजकुमार महादेव माने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.