कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापले! २४ नोव्हेंबरचा दिवस जिल्ह्यातल्या अठ्ठेचाळीस  गावांसाठी महत्वाचा; कारण आहे 'खास"..

 

बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  कडाक्याच्या थंडीत ग्रामीण  भागातील राजकीय वातावरण तापले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. याला निमित्त आहे ते ४८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे!जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

येत्या २४ नोव्हेंबरला ही निवडणूक होऊ घातली आहे. नगरपरिषद , जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा रणसंग्राम पूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक महत्वाच्या ठरल्या. यात महाविकास आघाडी किंचित वरचढ ठरल्याने  महायुतीला एक प्रकारे इशाराच मिळाला.
 
 या पार्श्वभूमीवर  ४८ उपसरपंच पदाची निवडणूक येत्या २४ तारखेला होऊ घातली आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुतेक ग्रामपंचायत मध्ये विजयी पॅनेलला बहुमत नाही, असे चित्र आहे. यामुळे २४ च्या निवडणुकीसाठी फोडाफोडी, इतर गटाच्या सदस्याला आपल्याकडे वळविण्याच्या, बहुमताची जुळवाजुळव आदी हालचालीना वेग आला आहे.

सरपंच निर्णायक!

दरम्यान निवडणूक झालेल्या ४८ ग्रामपंचायतींची पहिली सभा व  उप सरपंच निवड थेट सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. सरपंचांना ग्राम सचिव व तहसिल कर्मचारी सहाय्य करणार आहे. सरपंचांना 'व्हेटो पावर' अर्थात एक जादाचे मत देण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी हे जादाचे मत निर्णायक ठरणार आहे.

ही आहेत ती ४८ गावे..

बुलडाणा तालुक्यातील साखळी खुर्द, घाट नांदरा, पिंपळगाव सराई.                                                                                                                                                                                                                                                                  चिखली तालुक्यातील डोंगरशेवली, करणखेड, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहाँगिर, धानोरी, मेरा खुर्द, अंबाशी, आसोला बुद्रुक. 
देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव बु. दगडवाडी, असोला जहाँगिर. सिंदखेडराजा तालुक्यातील  सवडद, दरेगाव, पांगरी उगले, तांदलवाडी, मोहाडी, वरूडी, नसीराबाद.
मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर, घाटबोरी, चायगाव, जानेफळ, बाई, बेलगाव, मारोती पेठ.
लोणार तालुक्यातील देऊळगाव वायसा, पारडी मेहकर, सोमठाणा. खामगाव: जयपूर लांडे, अटाळी, घारोड, रोहणा, जयराम गड, माटरगाव.
शेगाव तालुक्यातील  टाकळी धारव, कालखेड. जळगाव जामोद तालुक्यातील विडी, अजमपूर, कुवरदेव, जामोद. मलकापूर तालुक्यातील  देवधाबा. नांदुरा तालुक्यातील रामपूर, फुली, इसरखेड तर मोताळा तालुक्यातील डिडोळा आणि  गोतमारा या गावांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे..