पोलीस विभागात हळहळ; अमडापूरच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या ! पंतप्रधान मोदींच्या सभेचा बंदोबस्तासाठी निघाले होते

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अमडापूर येथे कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन गायकवाड यांनी शेगाव येथील रेल्वे पटरीवर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल १८ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस विभागात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
 Advt. 👆
मृतक पोलीस अधिकारी किसन गायकवाड हे देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथील रहिवासी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी नेत्यांच्या सभा होत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी अमडापूर पोलीस ठाण्यातून वर्धा येथे १७ एप्रिलच्या व्हीआयपी बंदोबस्तासाठी त्यांना सोडण्यात आले होते. परंतु तेथे न जाता त्यांनी शेगाव येथील रेल्वे स्टेशन गाठले. त्यानंतर ओखापुरी २०८२० या रेल्वेखाली १८ एप्रिल रोजी उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या झाल्याची समजतात रेल्वे पोलीस ठाणेदार पंढरीनाथ मगर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. गायकवाड यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.