साथ सुटणार..! राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ भाजपच्या वाटेवर?
Dec 24, 2024, 11:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा यंदाचा निकाल राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावणारा ठरला. साहेब आणि विजय,साहेब आणि सत्ता असे समीकरण गत २५ वर्षांपासून असताना यावेळेला मात्र नवख्या मनोज कायंदे यांनी दिग्गजांना धुळ चारली. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय डॉ.शिंगणे यांना महागात पडला. जर शिंगणे यांनी अजित पवारांची साथ सोडली नसती तर कदाचित सिंदखेड राजा मतदारसंघाचे वर्तमान वेगळे असते..मात्र राजकारणात जर तरला अर्थ नसतो हेही तेवढेच खरे..त्यामुळे जे झाले गेले पार पडले..आता पुढे काय? सत्तेवाचून पुढची ५ वर्षे कशी काढायची? जनसेवा कशी करायची असा स्वाभाविक प्रश्न डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनाही पडला असेलच..या प्रश्नातून काहींनी मार्ग काढायचा ठरवल्याची पक्की खबर आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील चिखली तालुक्यात येणाऱ्या गावांचा राष्ट्रवादीचा चेहरा समजल्या जाणारे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ आता भाजपच्या वाटेवर असल्याची पक्की खबर आहे...त्यासाठीची चाचपणी त्यांच्याकडून सुरू आहे..स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने व भविष्यातील राजकीय वाटचालीच्या दृष्टिकोनातून गजानन वायाळ भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत...
यंदाच्या विधानसभा निवडणूक चिखली विधानसभा मतदारसंघातील २२ गावांत शिवसेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर आघाडीवर राहिले. गेल्यावेळी डॉ.शिंगणे या भागात पुढे होते. आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राज्यात आणि केंद्रातील सत्ता, महायुतीसाठी अनुकूल असलेले वातावरण यामुळे भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. त्यातही भाजपकडे जाणाऱ्यांचा ओढा जास्त आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या २२ गावांचा जास्त वावर हा चिखली विधानसभा मतदारसंघातच आहे. २०२६ मध्ये होऊ शकणाऱ्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत ही गावे पुन्हा एकदा चिखली विधानसभा मतदारसंघात जाऊ शकतात अशी शक्यता आहे. नाते गोते सगे–सोयरे असं सगळ काही चिखली विधानसभा मतदारसंघात असल्याने तसेच चिखली भाजप अनुकूल असल्याने आता गजानन वायाळ भाजपमध्ये जाण्याची चाचपणी करत असल्याचे कळते. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांचे माहेर मेरा बु आहे. त्यामुळे ताईंच्या माध्यमातून गजानन वायाळ भाजपात प्रवेश करू शकतात.पुढच्या काही दिवसांत भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर याबाबतचा ठोस निर्णय होणार असल्याची माहिती आहे...