सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठीचे आंदोलन पेटण्याची चिन्हे!
 

सरकारने शेतकऱ्यांना गृहीत धरणे सोडून द्यावे, शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद काय असते हे सरकारला दाखवून देऊ: रविकांत तुपकरांचा ईशारा! एल्गार रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद,२० नोव्हेंबरला एल्गार महामोर्चा...
 
बुलडाणा: सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय हक्कांसाठी रविकांत तुपकर यांनी एल्गार रथयात्रेच्या माध्यमातून आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. ५ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात एल्गार रथयात्रा सुरू असून या एल्गार रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २० नोव्हेंबरला या एल्गार रथयात्रेचे रूपांतर एल्गार महामोर्चात होणार आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हे तर सोयाबीन कापूस उत्पादक पट्ट्यातील लाखो शेतकरी बुलडाणा शहरात धडकणार आहेत. या महामोर्चात रविकांत तुपकर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची शक्यता असून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता चांगलेच पेटण्याची चिन्हे  आहेत.
 

 ५ नोव्हेंबर  पासून संत नगरी शेगावातून सुरू झालेली एल्गार रथयात्रा १६ नोव्हेंबरला मोताळा तालुक्यात दाखल झाली.हनवतखेड, गोतमारा, कोऱ्हाळा बाजार, खेडी, पान्हेरा, सारोळा मारोती, पोफळी, चावर्दा, पिंप्री गवळी, माकोडी - टेंभी, जहांगीरपूर, शेलगाव बाजार, सावरगाव, आव्हा, लिहा, पिंपळगाव देवी, धामणगाव बढे, सिंदखेड लपाली तर १७ नोव्हेंबरला किन्होळा, तपोवन, थळ, रोहिणखेड, उबाळखेड, नळकुंड, तांडा, दाभा, राहेरी, खामखेड, खडकी, मोहेगाव, राजूर, वाघजाळ, मोताळा (शहर), डीडोळा बु., घुस्सर बु., घुस्सर खुर्द, दाभाडी, तळणी, शेलापूर बु. शेलापूर खुर्द या गावांत एल्गार रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद सरकारला दाखवून देऊ: रविकांत तुपकर

  यंदा शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. अत्यल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली असली तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. सोयाबीनचा एकरी खर्च ३६ हजार तर उत्पन्न  केवळ १८ हजार आणि कापसाचा एकरी खर्च ४० हजार आणि उत्पन्न ३५ हजार अशी परिस्थिती आहे. सोयाबीनला किमान  ९ हजार तर कापसाला १२ हजार भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या अंगावर यंदाच्या दिवाळीत नवीन कपडे नाहीत. मात्र असंवेदनशील सरकार सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. गावगाड्यातला शेतकरी आता आपल्या हक्कांसाठी जागृत झाला आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना गृहीत धरू नये. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवून देऊ आणि सरकारची मस्ती उतरवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी एल्गार यात्रेदरम्यान धामणगाव बढे येथील सभेत सरकारला दिला. २० नोव्हेंबरला  बुलडाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चाला शेतकरी, शेतमजूर, शहरी नोकरदार वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी तुपकर यांनी केले.