इथल्या आमदाराचा खेळ आचारसंहितेपुरता! आता निवडणुकीत सुपडा साफ होणार! बुलडाण्यातून महाविकास आघाडीचाच आमदार जाणार!

सुषमा अंधारेंचे सूचक वक्तव्य; दिशा फेडरेशनच्या बचतगट प्रदर्शनीचे उद्घाटन..
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इथल्या आमदाराचे नाव घेऊन त्याला उगाच मोठे करण्याची इच्छा नाही. त्याचा खेळ फक्त आचारसंहिते पुरता आहे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होणार आहे असे म्हणत बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचाच आमदार सभागृहात जाईल असे सूचक वक्तव्य शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकारातून तसेच दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन आज,४ ऑक्टोबर रोजी झाले. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या..
 
Advt.👆

पुढे बोलतांना सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडके बहीण योजनेचा खरपूस भाषेत समाचार घेतला. एकनाथ शिंदेंनी काही वावर एकूण पंधराशे रुपये तुम्हाला दिले नाहीत किंवा देवेंद्र फडणवीस यांनी काही नागपूरचा बंगला विकला नाही असे अंधारे म्हणाल्या. १५०० रुपये आपल्या हक्काचे आहे, ते सगळ्यांनी घेतले पाहिजेत. तुमच्या आमच्या कराच्या पैशातून ते १५०० रुपये देत आहेत असे त्या म्हणाल्या.👇

तुम्ही तुमच्या बहिणीला मदत करता, तिच्या अडचणीच्या काळात हातावर ४ - ५ हजार रुपये टेकवता तेव्हा बॅनर लावता काय ? असा सवाल त्यांनी गर्दीत उपस्थित असलेल्या भावांना केला. हाच धागा पकडून सुषमा अंधारे यांनी शिंदे फडणवीस सरकार लाडकी बहीण योजनेच्या करत असलेल्या जाहिरातबाजीवर टीका केली. "चार आणेकी मुर्गी आणि बारा आणे का मसाला" असा हा प्रकार असल्याचे अंधारे म्हणाल्या. बहीण म्हणून नव्हे तर मतदार म्हणून तुमच्यावर त्यांचा डोळा आहे असेही त्या म्हणाल्या.👇
​​​​​​
 पंधराशे रुपयांना भुलणार का?
तुमच्या नवऱ्याच्या नोकरीचे ते बघत नाही. त्याच्या पेन्शनचे ते पाहत नाही. मुलाच्या शिक्षणाचे, रोजगाराचे, आरोग्याचे पाहत नाही मग त्यांच्या पंधराशे रुपयांना भुलणार का? असा सवाल अंधारे यांनी यावेळी केला. राज्यात महिला आणि मुलींची अब्रू सुरक्षित नाही, धावत्या बस मध्ये महिलांवर अत्याचार होतात. 75 वर्षाच्या आजी वर बलात्कार होतात, साडेतीन वर्षाच्या लेकराला देखील हैवान सोडत नाही. राज्यात पोलीस नावाची यंत्रणा शिल्लक नाही असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.👇
सध्या स्त्री शक्तीचा उत्सव सुरू आहे, मात्र लेकी-बाळी सुरक्षित नाही. पंधराशेच्या टिकल्या जास्त महत्त्वाच्या की लेकी बाळींची अब्रू महत्त्वाची याचा विचार तुम्हाला करावा लागेल असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. आई अंबाबाईला एवढीच विनंती करू शकते, आमच्या लेकी बाळींची सुरक्षा तूच करू शकते, कारण शिंदे फडणवीसांच्या सरकारकडून ती होऊ शकत नाही असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.👇
जयश्रीताईंच्या कामाचे कौतुक...
यावेळी सुषमा अंधारे यांनी भाषणातून जयश्रीताई शेळके यांचे कौतुक केले. बचत गटांची मोट बांधणे हे काही सोपे काम नाही. महिला सक्षमीकरणासाठी जयश्रीताई करत असलेले काम खरंच कौतुकास्पद आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या. ही जागा काँग्रेसला सुटली तर तुम्ही आहातच, आणि दुसऱ्या कुणाला सुटली ते जे व्हायचे ते होईल मात्र बुलडाणा विधानसभा मतदारसंघातला आमदार हा महाविकास आघाडीचाच जाईल असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.