महाविकास आघाडी आक्रमक; पत्रिकेत "सर्वजातीय महापुरुष उल्लेख" केल्यामुळे वाद उफाळला! स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय स्मारकाचे लोकार्पण का? महाविकास आघाडीची पत्रकार परिषद वादळी....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा दोन दिवसांवर आला असताना महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.आज,१७ सप्टेंबरला बुलडाण्यात महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकार्पण सोहळ्यावर सवाल उपस्थित केले. नगरपालिकेने छापलेल्या पत्रिकेत "सर्वजातीय महापुरुष" असा उल्लेख केल्याने महाविकास आघाडीकडून संताप व्यक्त करण्यात आला.पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट, परवानग्या याबद्दल देखील सवाल उपस्थित करण्यात आला.पत्रकार परिषदेला विधानपरिषद सदस्य आ.धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, ॲड विजय सावळे, प्रदेश सचिव जयश्री शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, संजय राठोड यांची उपस्थिती होती.
   यावेळी बोलतांना आ. धीरज लिंगाडे म्हणाले की, सिंधुदुर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. तो कोसळला म्हणून तमाम शिवप्रेमिंच्या भावना दुखावल्या आहेत. महापुरुषांच्या विषयी आमच्या मनात तीव्र आदराची भावना आहेत. केवळ पुतळे लावून आम्ही त्याकडे पाहणार नाही तर महापुरुषांची शिकवण आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणारे आहोत. महापुरुषांची कुठलीही जात नसते, मात्र नगरपालिकेने सर्व जातीचे महापुरुष असा शब्द वापरला त्याबद्दल आपला आक्षेप असल्याचे ते म्हणाले. बुलडाणा शहरात एवढे पुतळे उभारले त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का? असा सवाल त्यांनी केला. नगरपालिकेने जेवढ्या जागा हस्तांतरीत करून घेतल्या त्या पुतळे उभारण्यासाठी घेतल्या की पुतळे उभारण्यासाठी याचा खुलासा नगर पालिकेने करावा असेही ते म्हणाले. 
   कुठलीही शासनाची पत्रिका छापत असताना ती जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेणे अपेक्षित असते, मात्र जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्रिका बाबत सवाल उपस्थित केला तेव्हा अशी पत्रिका छापल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नसल्याचे समोर आले असे आ. लिंगाडे म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले....
 आ.गायकवाड यांच्या आधी शिवस्मारक समिती कार्यरत होती. मात्र सर्व काही मी केल्याचा आविर्भाव आ.गायकवाड आणत आहेत. आ.गायकवाड येण्याआधी स्मारक बनवण्यासाठी समितीने ४१ लाख रुपये दिले होते असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
जयश्री शेळके म्हणाल्या...
 महापुरुषांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात अस्मिता आहे. म्हणून आम्हाला या स्मारकांची काळजी आहे, त्यामूळेच या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का? हा सवाल महत्वाचे आहे असे काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके म्हणाल्या. पत्रिकेत सर्वजातीय महापुरुष असा उल्लेख झालेला आहे ही अतिशय गंभीर आहे असेही जयश्री शेळके म्हणाले. शासनाची मनोवृत्ती जातीय आहे की आमदारांची असा सवालही जयश्री शेळके म्हणाल्या...
लोकार्पणाला विरोध नाही...
महापुरुषांच्या स्मारकाच्या लोकार्पणाला आमचा विरोध नाही. मात्र भविष्यात स्मारकांची दुरावस्था, अवमान होउ नये ही आमची भावना आहे. त्यामुळे या स्मारकाचे लोकार्पण होण्याआधी स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे होते, आम्ही परवाच्या कार्यक्रमाला विरोध करणार नाही असे जयश्री शेळके म्हणाल्या...