निष्ठेचा वारकरी ...प्रचारात जयश्री ताईंच्याही एक पाऊल पुढे ! जालिंदर बुधवतांमुळे महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांनाही चढला हुरूप..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या ३० वर्षापेक्षा अधिक काळापासून शिवसेना नावाचा चार अक्षरी मंत्र जपत जालिंदर बुधवत यांनी आपली ओळख निर्माण केली. सोयगाव सारख्या आडवळणाच्या गावातून जिल्हा मुख्यालयाच्या बुलडाण्यात येत संघटनेमध्ये आपल्या क्रियाशीलतेने ताकद वाढवली. जी मिळेल ती कामगिरी सचोटीने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडत नाव कमवलं. ज्या - ज्या पदांवर पक्षाने संधी दिली त्याचं सोनं केलं.
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बुलडाणा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने शिवसेना टिकवली आणि ठाकरे गटाचा काम उभं केलं ते जालिंदर बुधवत या जिल्हाप्रमुखांने हे वास्तव "अगदी गल्ली ते दिल्ली" सगळ्यांनाच माहिती आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे तिकीटही त्यांना फायनल असताना ऐनवेळी झालेले बदल "मातोश्री"ला स्वीकारावे लागले. आणि जयश्रीताई शेळके यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. असं असलं तरीही मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य मानत हा गडी पुन्हा एकदा लढायला तयार झाला. गेल्या दोन-तीन दिवसात प्रचाराचा धुराळा उडत आहे. जयश्रीताई शेळके यांच्यासाठी प्रचाराचे नियोजन आखत त्यात जयश्रीताईच्याही एक पाऊल पुढे जालिंदर बुधवत दिसत आहेत. उमेदवारी वर हक्क असतानाही ऐनवेळी ती नाकारल्यानंतर "पक्षश्रेष्टीचा आदेश हेच आपलं सर्वस्व" हे मानत काम करण्याची या शिवसैनिकाची भूमिका महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हुरूप देणारी ठरली आहे.
तसं पाहिलं तर २०१४ ला ही सर्व पक्ष जेव्हा वेगवेगळे लढले तेव्हा विधानसभेला चिखली मध्ये जालिंदर बुधवत यांना अर्ज भरायला सांगण्यात आला होता. तत्कालीन नेत्यांचा आदेश मानत त्यांनी अर्ज भरला समीकरण बदलली.त्यानंतर जिल्हाप्रमुख म्हणून गावनिहाय शाखा स्थापन करत एकेक कार्यकर्ता पक्षासाठी जोडण्याचं काम केलं. २०१९ ला नक्कीच तिकीट फायनल राहील असा आशावाद होता. कारण ते सीनियर देखील होते. मात्र ऐनवेळी पुन्हा एकदा तत्कालीन नेतृत्वाने मनसेतून शिवसेनेत घेतलेले संजय गायकवाड यांना उमेदवारी चा एबी फॉर्म दिला. तेव्हाही शिवसेनेसाठीच हा शिलेदार प्रचारात झोकावून देताना दिसला. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती बुलडाणा या नावाला राज्यभर ओळख करून दिली. बुलडाणा बाजार समितीला बुधवत यांचा परिसस्पर्श झाल्याने तिचे रूपडे पालटले. ही बाजार समिती पाहायला जिल्हाच नव्हे तर राज्यातून अनेक लोक येतात.नाही म्हटलं तरी या बाजार समितीच्या बाबतीत तक्रारींचा रतीबही अनेक स्वकीयांनी त्यावेळी घातला होता.
मात्र ज्या झाडाला चांगली फळ असतात त्यालाच लोक दगडं मारतात असं म्हणून जालिंदर बुधवत यांनी आपलं काम सुरू ठेवलं. महा विकास आघाडीचे सरकार गेले आणि एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरत ते मुख्यमंत्री झाले. दरम्यान बाजार समितीच्या निवडणुका लागल्या. सत्ताधारी एक खासदार , दोन आमदार विरोधात असतानाही बुलडाणा बाजार समितीवर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाची सत्ता पठ्याने मिळवली. सभापती पदही राखले. संघटनेसाठी जिल्हाभर फिरून राज्यातली पहिली उद्धव ठाकरे यांची सभा देखील चिखली मध्ये यशस्वी करून दाखवली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जालिंदर बुधवत हेच शिवसेने ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून लढतील यात कोणाच्याही मनात शंका नव्हती. मात्र महाविकास आघाडीच्या काही समीकरणांमध्ये या निष्ठावंताला पुन्हा एकदा थांबण्याचा आदेश आला. शिवसैनिक आदेश मानणारा असतो;म्हणून जयश्री ताई शेळके यांच्यासाठी आपली उमेदवारी देत जालिंदर बुधवत पुन्हा एकदा पक्षाच्या कामाला जोमाने भिडले आहेत.जयश्रीताई शेळके यांच्या बुलढाणा तालुक्यातील प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली तेव्हा आपल्याच भागातून ती करण्याचा आग्रह आणि नियोजनाची सर्व भूमिका आपल्या साथीदारांसह पार पाडणारा हा शिलेदार महाविकास आघाडीचे नेत्यांसाठी देखील रोल मॉडेल ठरला आहे. नेतेच काय तर कार्यकर्त्यांमध्ये देखील जालिंदर बुधवत यांच्या या निष्ठावंत वारकऱ्यांच्या भूमिकेमुळे हुरूप चढला आहे.