तालुक्याच्या आरोग्य सेवत आमुलाग्र सुधारणा होणार! आमदार श्वेताताईंचे प्रतिपादन; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी चिखलीत उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण! 

 

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रत्येक नागरिकांसाठी आरोग्य सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साजरा होणाऱ्या सेवा पंधरवड्याच्या शुभारंभाला चिखली शहरात उपजिल्हा रुग्णालयाचे होणारे लोकार्पण हा अपूर्व योग जुळून आला आहे. याद्वारे तालुक्यातील वैद्यकीय सेवेत आमुलाग्र सुधारणा होईल, असा विश्वास आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला. चिखलीच्या श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाच्या साडेचार कोटी रुपये किंमतीच्या नवीन इमारतीचे सप्टेंबर १७ रोजी  लोकार्पणकर्ताना त्या बोलत होत्या.

प्रारंभी ३० खाटांवरून ५० खाटांमध्ये श्रेणीवर्धीत केलेल्या चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी मंचावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, ज्येष्ठ नेते रामदास देवडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शिवसेना नेते दत्ता खरात, शहर प्रमुख विलास घोलप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे आदी उपस्थित होते. चिखली उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आपण सादर केला होता, तेंव्हा त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती आणि आज या इमारतीचे लोकार्पण होत असल्याचे आ. श्वेताताई महाले म्हणाल्या. या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा देखील आपला पुरेपूर प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच डायलेसिस सेंटर सुरु होणार असून त्याच्या निविदा त्वरित काढण्याचे निर्देश आ. महाले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना दिले.

याशिवाय ट्रॉमा केअर सेंटरची मागणी देखील आपण केली असून लवकरच या केंद्राची या सुविधेचे सर्वात येथे होणार असल्याचे या म्हणाल्या. शासन आपल्या दारी या अभियानाचा दुसरा टप्पा चिखली मतदारसंघात आज टाकरखेड हेलगा येथून सुरू करण्यात आला असून प्रत्येक पंचायत समिती सर्कलमध्ये दर रविवारी हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आ. श्वेताताई महाले यांनी दिली. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले. यावेळी डॉ. प्रतापसिंह राजपूत, कृष्णकुमार सपकाळ, दत्ता खरात यांनी आपले विचार व्यक्त केले. गोपीनाथ लहाने, आशा घाटगे, अंबादास घाटगे, शैलेश बाहेती, नामू गुरुदासानी, गोविंद देवडे, सुभाष आप्पा झगडे, सुनील पोफळे, संतोष काळे, वीरेंद्र वानखेडे, विजय नकवाल यांच्यासह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. संचालन गणेश धुंदळे तर डॉ. किशोर गवई यांनी आभार मानले.         


आयुष्मान भारत कार्डचा लाभ घ्या

देशातील गोरगरीब जनतेला महागड्या आरोग्य सुविधांचा लाभ विनामूल्य मिळावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत या अभिनव संकल्पनेची सुरुवात केली. चिखली मतदारसंघातील जास्तीतजास्त नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्डच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी केले. आयुष्यमान भारत कार्ड काढणारे सर्वाधिक नागरिक चिखली तालुक्यातले असल्याची माहिती मला पंतप्रधान कार्यालयाकडून यापूर्वी मिळाली आहे, मात्र यापैकी बऱ्याचशा कार्ड धारकांचे केवायसी पूर्ण नसल्यामुळे त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागू शकते, त्यांनी आपले केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन देखील आ. महाले यांनी आपल्या भाषणातून केले.