महायुती सरकारला लाज नाही! हे शेतकऱ्यांच वाटोळ करणारं सरकार! डॉ. ऋतुजा चव्हाण यांचा हल्लाबोल; सोयाबीन प्रश्नावर लढण्याचा निर्धार.... सोयाबीन उत्पादक शेतकरी डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीशी...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रातले आणि राज्यातले सरकार आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणारे सरकार आहे. मेहकर लोणार मतदार संघातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे मात्र इथले आमदार त्यावर एक शब्दही बोलत नाहीत, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तर  शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नाही. निवडणूक संपल्यावर तो उमेदवार मुंबईला जाणार आहे. त्यामुळे इथल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी मला मतरुपी आशीर्वादाची गरज आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी केले. गाव भेट दौऱ्यानिमित्त आयोजित एका कॉर्नर बैठकीत त्या बोलत होत्या.

 पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. खाद्यतेलाचे भाव प्रति किलो ५० रुपयांनी वाढले आहेत. त्या तुलनेत सोयाबीनचे भाव मात्र  मात्र ४ हजार रुपयांच्या पुढे जायला तयार नाहीत. सोयाबीन कापूस प्रश्नावर कोणताही आमदार सभागृहात बोलत नाही, शेतकरी मेला तरी यांना फरक पडत नाही. त्यामुळे पुढच्या काळात सोयाबीन कापूस या प्रश्नावर आपला लढा सभागृहात सुरू करणार असल्याचेही डॉ. ऋतुजा चव्हाण म्हणाल्या. मेहकर लोणार मतदार संघातील शेतकरी आपल्या पाठीशी आहेत, सर्व जाती धर्म पंथ संप्रदायांची माणसेही आपल्या सोबत असल्याने विजय होईलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.