सरकारने संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी! जयश्री शेळके यांची मागणी; म्हणाल्या, नाहीतर आंदोलन करू...

 

बुलडाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा)– राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातही गारपिटीसह वादळी वाऱ्यामुळे तब्बल १६६ गावांमध्ये शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा गट) नेत्या जयश्री शेळके यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. 

जयश्री शेळके म्हणाल्या की, "ज्या सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, तेच सरकार आता हात वर करत आहे आणि कर्जमाफी नाकारत आहे. एकीकडे शेतकरी आधीच संकटात सापडलेला असताना, आता नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे हाताशी आलेले पीकही गेलं आहे. अशा परिस्थितीत शासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी." असे जयश्री शेळके म्हणाल्या.

नुकत्याच झालेल्या आपत्तीनंतर शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला आहे. त्यामुळे शासनाने सर्वेक्षण प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून योग्य ते नुकसान भरपाई दिली नाही उबाठा शिवसेना आंदोलन करेल असा इशाराही जयश्री शेळके यांनी दिला...