खेळातून खेळभावना वृद्धिंगत व्हावी; संदीप शेळकेंचे प्रतिपादन! असोला नाईक येथील बंजारा चषक क्रिकेट स्पर्धेचा समारोप
Nov 20, 2023, 20:37 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खेळ म्हटलं की, विजय, पराभव आलाच. एक टीम जिंकणार तर दुसरी हारणार. पराभव झाला म्हणून खचून जायचे नाही. आपल्या खेळातील उणिवा शोधून त्यामध्ये सुधारणा करायची. पुढच्या वेळी कसे जिंकता येईल, हा विचार करायचा. खेळातून खेळभावना वृद्धिंगत व्हावी, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांनी केले.
चिखली तालुक्यातील असोला नाईक येथे २० नोव्हेंबर रोजी बंजारा चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर नारायण राठोड, राम पवार, दयाराम राठोड, चंदन चव्हाण, जगदीश महाराज, सुरेश महाराज आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, ग्रामीण भागात गुणी खेळाडू आहेत. त्यांना संधी मिळाल्यास ते चुणूक दाखवू शकतात. स्पर्धेतून खेळाडू घडत असतात. त्यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. राजर्षी शाहू परिवाराने नेहमीच खेळाडूंना पाठबळ दिले आहे. भविष्यातही आपण खेळाडूंच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही संदीप शेळके यांनी यावेळी दिली.
असोला नाईक येथे ११ नोव्हेंबरपासून क्रिकेट स्पर्धा सुरु झाली होती. स्पर्धेचे हे दहावे वर्षे आहे. सोमवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. अमडापूर येथील ग्रीन स्टार क्रिकेट क्लबने प्रथम बक्षीस पटकावले तर वरवंड संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. शांततामय वातावरणात ही क्रिकेट स्पर्धा पार पडली.