तब्बल १० तास चालला जिल्ह्याच्या विकासाचा गजर! वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन पदयात्रेला उदंड प्रतिसाद! जगदंबा माता, रेणुका माता या दोन शक्तीपीठांना घातले जिल्ह्याच्या विकासाचे साकडे!

संदीप  शेळकेंचे जिल्हावासियांना आवाहन, म्हणाले,विकासासाठी परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हा! लोकप्रतिनिधींनी भूलथापा देण्याचे काम केल्याचा केला आरोप..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "ऑक्टोबर हीट" चे घाम काढणारे ऊन असताना सुद्धा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी काढलेली बुलडाणा परिवर्तन पदयात्रा "हीट" ठरली. बुलडाण्याची जगदंबा माता ते चिखलीचे रेणुका माता मंदिर असा २५ किलोमीटरचा पायी प्रवास  ४ ते ५ तासांत पूर्ण होणे अपेक्षित असताना जागोजागी होणारे  पदयात्रेचे स्वागत, फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी आणि संदीप शेळके यांना भेटण्यासाठी झालेली आबालवृद्धांची गर्दी यामुळे तब्बल १० तास ही पदयात्रा चालली. मात्र एवढे होऊनही बुलडाण्यातून ज्या उत्साहात पदयात्रा सुरू झाली तो उत्साह तसुभरही कमी न होता उलट वाढत गेला..लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना संदीप शेळकेंनी जिल्ह्याच्या मागासलेपणाचे   सिमोलंघन करण्यासाठी काढलेल्या या पदयात्रेची जिल्हाभरात चर्चा होती. विशेषत: राजकीय वर्तुळाचे देखील या यात्रेकडे लक्ष लागून होते.."आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक ,भौगोलिक दृष्ट्या गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आपल्या जिल्ह्यात सगळ काही आहे, मात्र तरीही राज्याच्या पटलावर बुलडाणा जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा म्हणून होते. यावेळी मनाला खंत वाटते. आतापर्यंत लोकप्रतीनिधींनी जिल्ह्याच्या विकासाच्या केवळ भूलथापा मारल्या असा थेट आरोप करीत आता आपल्याला जिल्ह्याचे मागासलेपण दूर करायचे आहे, त्याकरिता वन बुलडाणा मिशन ही राजकीय चळवळ आहे. या परिवर्तनाच्या चळवळीत जिल्हावासियांनी सहभागी व्हावे." असे आवाहन यावेळी संदीप शेळके यांनी केले..
 

सकाळी ७ वाजता जगदंबा मातेची आरती करून यात्रेचे चिखलीच्या दिशेने प्रस्थान झाले. संदीप शेळके यांच्या अर्धांगिनी तथा राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक पदयात्रेत सहभागी झाले. रस्त्याने जागोजागी पदयात्रेचे स्वागत करण्यात येत होते. माता - भगिनी संदीप शेळके यांचे औक्षण करीत होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या पदयात्रेदरम्यान संदीप शेळके यांची भेट घेऊन पदयात्रेला पाठिंबा दिला..

 भजन अन् जिल्ह्याच्या विकासाच्या घोषणांनी दुमदुमून गेला चिखली रोड..!

  या पदयात्रेत जिल्ह्याच्या कृषी तसेच अध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. जिल्ह्यातील विविध गावांतील भजनी मंडळे या परिवर्तनाच्या पदयात्रेत सहभागी झाली होती. जिल्ह्यात प्रामुख्याने येणारी सोयाबीन, तुर, कापूस, ऊस या पिकांसह  दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी  बैलगाड्या देखील या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्याच्या कृषी संस्कृतीचे दर्शन या माध्यमातून घडले..

 मागण्यांच्या फलकांनी  वेधले लक्ष...

   यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातातील मागण्यांचे फलक साऱ्यांचेच लक्ष वेधत होते. जिल्ह्याला विशेष दर्जा मिळालाच पाहिजे, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारा,  सोयाबीन कापसाला चांगला भाव द्या, यलो मोझॅक नुकसान भरपाई मिळावी, जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झाले पाहिजे, बुलढाणा पर्यटन प्राधिकरण स्थापन करा, सिंदखेडराजात महिलांना विविध क्षेत्रात शिक्षण प्रशिक्षण देणारे शक्तिकेंद्र उभारा , देऊळगाव राजा येथे सीड हब झाले पाहिजे, लोणारला ग्लोबल बायो डायव्हर्सिटी पार्क,  जिल्ह्यात कडधान्य, भरडधान्य पार्क उभारा, बुलढाण्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करा, गावोगावी रनिंग ट्रॅक झाले पाहिजे, सोयाबीन कापसाला भाव मिळाला पाहिजे आदी मागण्यांचे फलक परिवर्तन पदयात्रेत चालणाऱ्यांनी हाती घेतले होते.

चिखलीत उस्फुर्त स्वागत..!

सायंकाळी ५ च्या सुमारास चिखलीत पदयात्रा दाखल झाली तेव्हा चिखलीकरांनी पदयात्रेचे उस्फुर्त स्वागत केले. जे दिवसभर यात्रेत सहभागी होऊ शकले नाही ते देखील सायंकाळी पदयात्रेत सहभागी झाले.  ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा चिखलीचे आराध्य दैवत रेणुका मातेच्या मंदिरात पोहचली. जिल्ह्याच्या विकासासाठी बळ देण्याची प्रार्थना संदीप शेळकेंनी करीत विकासासाठी साकडे घातले. यानंतर पदयात्रेतील सहभागी यात्रेकरुंनी दर्शन घेतल्यानंतर यात्रेचा समारोप झाला..!