जिल्ह्यातल्या ११ नगरपालिकांचा आज फैसला! ८७ उमेदवारांपैकी कोण नशीबवान? कुणाच्या गळ्यात पडणार नगराध्यक्षाची..
Dec 21, 2025, 09:55 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यसह जिल्ह्यातल्या ११ नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साधारण पुढील २ ते ३ तासांत चित्र स्पष्ट होईल. ११ नगरपालिकेत एकूण ८७ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढली होती, त्यापैकी ११ नशीबवान कोण? हे चित्र आज स्पष्ट होईल..
बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मेहकर, लोणार, खामगाव , शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर आणि नांदुरा अशा ११ नगरपालिकांमध्ये मतदान झाले होते. एकूण ११८१ उमेदवारांनी नगरसेवकाची निवडणूक लढली होती, त्यापैकी २८६ नगरसेवक निवडले जाणार आहेत. जिल्ह्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल असे भाकीत विविध एक्झिट पोल ने वर्तवले आहे. दरम्यान बुलढाणा आणि चिखली या दोन नगरपालिकांच्या निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. बुलडाणा लाइव्ह वर या निकालाचे अपडेट पाहता येणार आहेत..