प्रचाराच्या तोफा थंडावल्या! आता उमेदवारांचा भेटी गाठींवर जोर! आजची उद्याची रात्र महत्वाची! गठ्ठा मतांची सोय करण्यावर उमेदवारांचे लक्ष, रातोरात खेळ होण्याची शक्यता...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज ,२४ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजेपासून थांबल्या आहेत. आता उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचार करता येणार नाही. आता उमेदवारांचा जोर प्रत्यक्ष भेटीगाठींवर, फोना-  फानी करण्यावर राहणार आहे.
 ८ तारखेला उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाल्यानंतर ९ एप्रीलपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. या दरम्यान प्रचार रॅली, सभा, कॉर्नर मीटिंग, रोड शो यांना परवानगी होती.मात्र आता यापैकी काहीही उमेदवारांना करता येणार नाही. आता उमेदवार प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊ शकतात, शिवाय नातेवाईकांना, पाहुण्या राहुण्यांना फोन फानी करून सेटिंग लावण्यावर उमेदवारांचा भर असणार आहे. आजच्या आणि उद्याच्या रात्री काही गठ्ठा मतांची सोय करता येईल का यावरही उमेदवार लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे रातोरात "खेळ" होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मतदारांनी कुठल्याही आमिषांना बळी न पडता लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून मतदान करावे असे आवाहन "बुलडाणा लाइव्ह" करत आहे.