शेतकरी विरोधी सरकार सत्तेवरून खाली खेचावेच लागेल! नाथाभाऊ खडसेंचा प्रहार; भ्रष्टाचार रोखण्यासाठी जयश्रीताई शेळके यांची विजयी मशाल पेटवण्याचे केले आवाहन! मोताळ्यात पार पडली जाहीर सभा..
Nov 17, 2024, 16:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज सोयाबीन, कपास, मका यासह शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज वाढत आहेत. महायुती सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी धोरण आहे. महा विकास आघाडीचे सरकार येताच कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळण्यात येईल. त्यासाठी शेतकरीविरोधी सरकार सत्तेवरून खाली खेचावे लागेल, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे यांनी करून बुलढाण्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी जयश्री ताई शेळके यांची विजयाची मशाल पेटवण्याचे आवाहन सुद्धा केले.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारार्थ एकनाथ खडसे यांची जाहीर भरगच्च सभा मोताळा येथे पार पडली. व्यासपीठावर शिवसेना माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, धृपदराव सावळे, आमदार धीरज लिंगाडे, एडवोकेट संजय राठोड, जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ बुधवत, नरेश शेळके, डॉक्टर कोलते, रायपुरे तसेच आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांचे सहभाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकार उपस्थिती होती.
यावेळी नाथाभाऊ पुढे म्हणाले की, राज्य सरकारने केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून आया बहिणींच्या डोळयांत अश्रू आणले. निर्दयी सरकारने सोन्याच्या किंमतीत अवाजवी वाढ करून सर्वसामान्य महिलांचे मंगळसूत्र देखील महाग केले. मोताळा परिसराचा विकास ठप्प झाला आहे. एमआयडीसीचा प्रश्नही रेंगाळत पडला आहे. बुलढाणा मतदार संघाला विकासाभिमुख, सुसंस्कृत आणि शिक्षित चेहरा हवा आहे. यासाठी जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले.
यावेळी खडसे यांनी महायुती सरकार, त्यांचे धोरण आणि कार्यपद्धती यावर टीकेची झोड उठविली. महायुती सरकारने विकासाच्या नावावर पैश्यांची भरमसाठ उधळपट्टी केली. परिणामी राज्य सरकार अक्षरशः दिवाळखोरीच्या गर्तेत सापडले आहे.राज्यावर ८ लाख कोटी रुपयांचे महा कर्ज झाल्याचा घणाघाती आरोप खडसे यांनी केला. संजय गांधी निराधार सारख्या योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम वेळेवर मिळत नसून ठिबक योजनेसारख्या अनेक योजनांचे अनुदान, शेतकऱ्यांची मदत रखडली आहे.
अडीच वर्षांत गोर गरीब बहीण आठवली नाही, मग विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच कशी बहीण लाडकी झाली? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचा कापूस हाताशी येत असताना त्यांनी २२ लाख कापसाच्या गाठी आयात केल्या. त्यामुळे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव, सिंचनाची सोय नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणि महागाई गगनाला भिडले. अजूनही शेतकरी कोणताही सौदा कापूस , सोयाबीन विकण्याच्या मदतीवर करतात, लग्नकार्य ही हंगामा नंतर करण्यात येतात. मात्र मालाला कवडीमोल भाव मिळाला. लग्नाला दागिने करावे तर पाऊण लाखावर भाव.त्यामुळे या दळभद्री सरकारने गरिबांसाठी मंगळसुत्रही महाग करून टाकले असा घणाघात करून त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.
नाथाभाऊंच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी : जयश्रीताई शेळके
नाथाभाऊ यांच्या शब्दाला या मतदारसंघांमध्ये मोठा मान आहे. तुमच्या शब्दाकडेच मतदारांचे लक्ष असते. आज भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत हे बळ देणारे आहे. बुलढाणा मतदारसंघामध्ये लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी लढाई आहे. त्यामुळे आपण लोकशाहीच्या बाजूने उभे राहून गुंडगिरीला बाहेरचा रस्ता दाखवा. सौंदर्यकरण करून ,त्यालाच विकास म्हटले जातय. त्याचाच ढोल पिटला जातोय, मात्र मोताळा एमआयडीसीचा प्रश्न जसा आहे तसाच आहे. मोताळा आणि मोताळा परिसराचा विकास का झाला नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.