बुलडाण्याला प्रवीण तोगडियांची अचानक भेट!

शहरभर तगडा बंदोबस्त, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया काल, ७ डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास अचानक बुलडाण्यात दाखल झाले. त्‍यांचा दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता.

विष्णूवाडीतील डॉ. अस्मिता चिंचोळकर यांच्या निवासस्थानी ते मुक्कामाला होते. दुपारी १२ वाजता विष्णूवाडीतीलच राजे मंगल कार्यालयात ते राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पोलिसांनी शहरभर पोलीस बंदोबस्‍त कडक केला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी राजे मंगल कार्यालयात येऊन सुरक्षेचा आढावा घेतला.

तोगडियांना झेड प्लस सुरक्षा असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तोगडिया हे मोदीविरोधी म्‍हणून ओळखले जातात. मतभेदांमुळे विश्व हिंदू परिषदेतून बाहेर पडून त्‍यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्‍थापना केलेली आहे. वादग्रस्त वक्‍तव्‍यांमुळे ते चर्चेत असतात. त्‍यामुळे शहरातही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ते काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहा व्हिडिओ ः