रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष! आज घेणार मोठा निर्णय! तातडीची बैठक बोलावली! राज्यभराततील पदाधिकारीही बैठकीला असणार उपस्थित...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राज्याच्या शेतकरी चळवळीतील प्रमुख चेहरा म्हणून राज्यभर ओळखले जाणारे रविकांत तुपकर हे येणाऱ्या विधानसभेचे अनुषंगाने आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. यासाठी त्यांनी राज्य व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि समर्थकांची तातडीची बैठक बोलावली आहे. बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील गोलांडे लॉन्स येथे सकाळी १०.०० वा. या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत रविकांत तुपकर कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. 

 विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच पक्ष आणि संघटनांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. रविकांत तुपकर यांनी देखील राज्यातील काही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय यापूर्वीच पुणे येथील बैठकीत जाहीर केला होता. त्या अनुषंगाने तुपकरांनी राज्यात विविध ठिकाणी मेळावे देखील घेतले. दरम्यान रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावे, यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत. गेल्या आठवड्यात रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दोन बैठका झाल्याचे वृत्त समोर आले होते. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी देखील तुपकरांची चर्चा झाली होती तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी देखील रविकांत तुपकरांची एका भेटीत आघाडीत सहभागी होणे बाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघासह आणखी काही जागांबाबत रविकांत तुपकर आग्रही असल्याचे समजते. यासंदर्भात त्यांची महाविकास आघाडीशी चर्चा चालू आहे. त्यामुळे रविकांत तुपकर महाविकास आघाडीत सहभागी होतील की काही वेगळा निर्णय घेतात, अशी देखील चर्चा आहे. दरम्यान आता रविकांत तुपकर यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकारी व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व समर्थकांची २२ नोव्हेंबर रोजी गोलांडे लॉन्स येथे सकाळी १०.०० वा. तातडीची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात पुढील दिशा ठरवून महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्यासाठी व चळवळीची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बॊलावण्यात आली आहे.  

रविकांत तुपकर या बैठकीत काय निर्णय घेतात आणि कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे आता बुलढाणा जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे, त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.   

     राज्यातील पदाधिकाऱ्यांचीही बोलावली बैठक...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय निर्णय घेण्यासाठी रविकांत तुपकर यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची देखील बैठक बोलावली आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक सकाळी ९.०० वा. पार पडणार असून या बैठकीत राजकीय भूमिका व चळवळीची पुढील दिशा यावर सविस्तर चर्चा होणार आहे. राज्य पातळीवर पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेवून निर्णय घेणार आहेत. या बैठकी नंतर तुपकर नेमकी कोणती राजकीय भूमिका आणि कोणता निर्णय जाहीर करतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.