बुलडाणा जिल्ह्यात आवास योजनांच्या कामांना गती द्या – प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे निर्देश! जिल्हा परिषद सभागृहात घेतली बैठक...

 
बुलडाणा (जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच राज्य शासनाच्या विविध आवास योजनांमधून बुलडाणा जिल्ह्यासाठी ठरविण्यात आलेले १ लाख २० हजारांहून अधिक घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी कामांना गती द्या, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत डवले यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि मोदी आवास योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, संजय इंगळे, गटविकास अधिकारी, कृषी सेवक आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
डवले म्हणाले, “केंद्र व राज्य शासनाने बुलडाणा जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर केली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करून तातडीने कामांना सुरुवात करा. विशेषतः अपूर्ण असलेल्या घरकुलांची संख्या अधिक असून, ती पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी.”
योजना अंमलबजावणीत पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने अटी शिथिल केल्या आहेत व निधीही वेळेवर उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने अधिक प्रभावी कामगिरी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
शहरी व ग्रामीण भागातील घरकुल योजनांचे वेळेत व प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करून प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा प्रधान सचिवांनी व्यक्त केली.