मराठा आरक्षणाच्या चर्चेवर बोलतांना मांडली आ.संजय कुटें यांनी सडेतोड भूमिका! म्हणाले, जातींच्या गणितावर ठरते नेत्यांचे समीकरण; आरक्षण द्या पण स्वतंत्र!
Dec 14, 2023, 08:44 IST
नागपूर( राजेंद्र काळे):मी कधीही जातीवर बोलत नाही पण खरं सांगू, आजकाल प्रत्येक आमदार वा नेता हा त्याच्या मतदार संघातल्या जातीच्या गणितावर राजकीय समीकरण ठरवत असतो. आज सर्वत्र आपल्या राजकीय सोईचे काय राहील? कोणाची बाजू घेतली तर आपला मतदार संघ सुरक्षित होईल.. याच अविर्भावातून मराठा आरक्षण संदर्भात सभगृहात बोलल्या जात आहे, स्वत:चे राजकारण सांभाळत पुढे जाणे हे सध्या अत्यंत धोक्याचे झाले आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ते स्वतंत्रपणे.. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही आपली भूमिका असल्याचे आ. डॉ.संजय कुटे यांनी सांगून मराठा आरक्षणावर आपली सडेतोड भूमिका मांडली.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवार १२ डिसेंबरपासून मराठा आरक्षणावर गरमा-गरम चर्चा सुरु आहे. यात आज बुधवार १३ ऑक्टोबर रोजी भाग घेतांना आ.डॉ.संजय कुटे म्हणाले की, आमदारांनी आपल्या जातीचा उल्लेख सभागृहात केला तर जातीचे लोक खुश होऊन मते देतील, अशी भावना सध्या सर्वत्र आहे. मराठा कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. पण सत्य कुणीच बोलत नाही. ज्यादिवशी नेते स्पष्ट व खरे बोलायला लागतील, तेव्हा जाती-जातीचे भांडण लागणार नाहीत. सर्वांना वाटते की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण असा कोणता पक्ष आहे की जो सांगेल मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, असं सांगणारा एकही नेता सभागृहात नाही.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेच पण ओबीसी मधून नको हेच सर्व नेत्यांची भूमिका आहे, मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एकतरी आमदार सभागृहात आहेत का? कारण सर्वांना माहिती आहे की अस करता येऊ शकत नाही मग याविषयी का कुणी बोलत नाही? का कुण्या दोन चार लोकांनाच टार्गेट केल्या जाते? याचाही विचार झाला पाहिजे. कुणाला किती टार्गेट केल्या जात आहे, हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे.. असंही रोखठोकपणे आ.संजय कुटे म्हणाले.
आ.डॉ.संजय कुटे यांनी केलेल्या २५ मिनीटांच्या या घणाघाती भाषणात मांडलेले अनेक विषय अन् मुद्दे सडेतोड ठरले!
राजकारण हे सेवेचे साधन आहे, माझ्या आई-वडीलांनी मला लोकांची सेवा करायचे संस्कार दिले आहे. हे सभागृह लोकांसाठी आहे, या आरक्षणाच्या मागे स्वत:चा हेतू साधने हेच काम सध्या सुरू आहे. माझ्या मतदार संघातील नागरिक म्हणतात याविषयावर बोलूच नका, एकाची बाजू मांडली तर दुसरा नाराज आणि दुसर्याची बाजू मांडली तर तिसरा नाराज.. अशी भावना आहे. पण कुणाला तरी बोलावं लागेल, सर्वच लोक आता संत महात्मे असल्यासारखे भाषण करायला लागले आहेत.