बुलडाणा जिल्ह्यातील काही अधिकारी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करतात! बाहेरच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कोट्यावधीची माया जमवली; हजार हजार रुपये घेतात; त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार! 

एल्गार मोर्चात तुपकरांनी भरला दम! तुपकरांचा रोख जिल्हा परिषदेतल्या खादाड अधिकाऱ्यांवर? 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी शेतमजुरांसाठी काढलेला एल्गार महामोर्चा रेकॉर्डब्रेक ठरला. संपूर्ण राज्याचे व राजकीय वर्तुळाचेही या एल्गार मोर्चाकडे लक्ष लागून होते. दरम्यान या मोर्चात झालेले रविकांत तुपकरांचे भाषणही वादळी ठरले. नाव न घेता त्यांनी एल्गार मोर्चात आडकाठी आणणाऱ्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. याशिवाय काही सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढत त्यांनी पुढील काळात भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगितले.."काही सरकारी अधिकारी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करतात, सामान्य नागरिकांकडून सरकारी कामाचे पैसे घेतात..काही अधिकारी तर हजार हजार रुपये जमा करतात.." असे तुपकर त्यांच्या भाषणात म्हणाले. 
"काही अधिकारी सत्ताधाऱ्यांची चाटूगिरी करतात.जिल्ह्यात काही बाहेरच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचेही तुपकर म्हणाले. यापुढे सामान्य शेतकऱ्याला कोणत्याही सरकारी ऑफिस मध्ये त्रास झाला तर तुमचे ऑफिस ठिकाणावर ठेवणार नाही" असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. 
रविकांत तुपकर यांचा रोख नेमका कोणत्या अधिकाऱ्यावर यावर सभास्थळी चांगलीच चर्चा रंगली होती. रविकांत तुपकर यांनी जिल्हा परिषदेतील काही "खादाड" अधिकाऱ्यांना उद्देशून उपरोक्त विधान केल्याची चर्चा आहे. काही दिवसांआधी तुपकर यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर रोष व्यक्त करीत विभागीय आयुक्तांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची तक्रार केली होती हे इथे उल्लेखनीय..!