जिल्हा परिषदेची निवडणूक वेळेवर लागण्याची चिन्हे!

कच्ची प्रभाग रचना करण्याचे निर्देश!! जिल्ह्यात वाढणार एक मतदारसंघ; आता ६१ गट
 
 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २०२२ च्या प्रारंभी मुदत संपणाऱ्या बुलडाणा जिल्हा परिषदेची निवडणूक वेळेवर लागण्याची चिन्हे आहेत. याचे कारण निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारसंघांची कच्ची प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ पातळीवर करण्यात आलेल्या पुनर्रचनेत जिल्हा परिषदेचा एक मतदार गट  तर पंचायत समित्यांचे दोन गण वाढले आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण राजकारणाची शान असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी चालविली असल्याचे मानले जात आहे.

राजकीय हस्तक्षेप, गोपनीयता राखण्यात येणारे अपयश, यामुळे न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे, निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता निवडणूक आयोग स्वतः प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देणार आहे. यापूर्वी मान्यता विभागीय आयुक्त देत होते. दरम्यान, वरिष्ठ पातळीवर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गणाची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा एक गट वाढणार आहे. वरिष्ठ  सूत्रानुसार शेगाव तालुक्यातील एक जि.प. गट कमी करण्यात आला असून, मेहकर व मोताळा तालुक्यातीलमधील प्रत्येकी एक गट वाढला आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची (मतदार गटाची) संख्या ६१ झाली आहे. यामुळे पंचायत समिती गणाची संख्या १२० वरून १२२ इतकी झाली आहे.

३ तालुक्यांत ७ गट...
दरम्यान, नव्या रचनेनुसार खामगाव, मेहकर, चिखली या तालुक्यात आता प्रत्येकी ७ जि. प. मतदारसंघ (गट) तर १४ पंचायत समिती गण राहणार आहेत. उर्वरित तालुक्यांतील गट व गण संख्या अशी ः  बुलडाणा तालुक्यात ६ गट व १२ गण राहणार आहे. मोताळा व सिंदखेडराजा तालुक्यात प्रत्येकी ५ जि. प. गट आणि १० पं.स. गण, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, लोणार तालुक्यात प्रत्‍येकी ४ जि.प. गट तर ८ पं.स. गण राहणार आहेत. मलकापूर व देऊळगाव राजा तालुक्यात प्रत्येकी ३ गट तर ६ गण तर शेगाव तालुक्यात २ गट तर ४ गण राहणार आहेत.