मेहकरात सिद्धार्थ खरातांपुढे अडचणींचा डोंगर! काँग्रेसने आवळला "एकला चलो रे" चा नारा! लक्ष्मण घुमरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! खरातांच्या उमेदवारीवरही नाराजी! डॉ.रायमुलकरांना लढत आणखी सोपी..

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेने सिद्धार्थ खरातांना दिलेली उमेदवारी अनेकांच्या पचनी पडलेली दिसत नाही. महाविकास आघाडीकडून खरात यांची उमेदवारी जाहीर झालेली असली तरी आघाडीतील घटक पक्ष असलेली काँग्रेस मात्र एकला चलो रे च्या भूमिकेत आहे. या मतदारसंघातून लक्ष्मण घुमरे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा सूर काँग्रेसच्या बैठकीतून बाहेर आला आहे. काल, २५ ऑक्टोबरला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस कार्यालयात झाली. मेहकर मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला होता, मात्र काँग्रेसच्या वाट्याला जागा आली नाही. उबाठा शिवसेनेने देखील निष्क्रिय उमेदवाराला उमेदवारी दिल्याचे बैठकीत मांडण्यात आले..एकंदरीत या सगळ्या प्रकारामुळे उबाठा शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे..दुसऱ्या बाजूला आमदार रायमुलकरांना ही लढत आणखी सोपी जाण्याची चिन्हे आहेत..खरात प्रमुख लढतीतून बाहेर पडून लढत तिरंगी होते की काय? अशीही चिन्हे निर्माण झाली आहेत...

​​​​​
 काल तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेली बैठक वादळी ठरली. नंदू बोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या ४ नेत्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र तरीही जागा काँग्रेसला न सुटल्याने काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सिद्धार्थ खरात या उबाठाने दिलेल्या बाहेरच्या उमेदवाराचे काम करण्याची मनस्थिती कार्यकर्त्यांची नाही अशा भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. शिवाय लक्ष्मण घुमरे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी लावून धरला. अखेर कार्यकर्त्यांची मते विचारात घेत लक्ष्मण घुमरे यांनी २८ ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाचा व अपक्ष म्हणून फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदेश काँग्रेसलाही मेहकर मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. या बैठकीला नंदूभाऊ बोरे,वसंतराव देशमुख नाझीम भाई कुरेशी, देवानंद पवार, भास्करराव ठाकरे, संतोषराव नरवाडे, अभिमन्यू नवले, विनायक टाले, डॉक्टर शेषराव बदर, साहेबराव खंडारे, ज्ञानेश्वर काठोळे, राजाराम वाटसर, वामनराव मोरे, भानुदास अजगर, दिलीप बो, भूषण काळे, प्रकाश देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, संजय सुळकर, विश्वास दुतोंडे, गणेश विलास गवई, गणेश मोसंबे, श्रीधर लहाने, अशोक उबाळे, संतोष खरात, दिलीप राठोड, दत्ता गिऱ्हे डॉक्टर रामेश्वर देशमुख, श्रीचंद पवार, अनिल देशमुख, रमेश राठोड, रमेश तांगडे, तुकाराम चव्हाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते...