शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाने प्रसंगावधान राखले; रेतीच्या ढिगार्यावर बस चढवून थांबवली; हातनी जवळील घटना! नेहमी इथेच ब्रेक फेल का होतात?
Dec 8, 2024, 09:55 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील हातनी जवळ शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र अगदी अलीकडच्या काळात परिवहन विभागात दाखल झालेल्या शिवशाही एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने परिवहन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.ब्रेक फेल झाल्याने या चालकाने प्रसंगावधान राखले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या रेतीच्या ढिगार्यावर बस चढवून ती थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात बस काही प्रमाणात रस्त्याच्या कडेला घसरली, या अपघातात दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या आहेत..
प्राप्त माहितीनुसार बुलढाणा आगाराची एम एच ०६, बी डब्ल्यू ३५८७ ही बस बुलडाण्यावरून चिखली कडे जात होती. हातनी जवळील घाट उतारात बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. हातनी गावाजवळ रस्त्याच्या कडेला रेतीचा ढिगारा होता. चालकाने प्रसंगावधान राखत बस रेतीच्या ढिगार्यावर नेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला..मात्र भंगार एसटी बसेस चा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे..
विशेष म्हणजे याआधी दोन ते तीन वेळा हातनी गावाजवळच एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे अशा घटना इथेच का होतात? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे...