EXCLUSIVE अरविंद सावंतांसमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा बुधवंताविरोधात एल्गार! उमेदवारीला विरोध; पदाधिकारी म्हणाले,"
....तर लोकसभाही आपण जिंकलो असतो"; अकोल्याच्या बैठकीत काय काय झालं..वाचा..
Jul 16, 2024, 12:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेचे विभागीय नेते अरविंद सावंत काल, १५ जुलै रोजी अकोल्यात आले होते. अकोल्यात त्यांनी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला. बैठका तशा चांगल्या झाल्या, मात्र बैठकीनंतरच्या व्यक्तिगत भेटीत मात्र धुसफुस समोर आली. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचे झाल्यास, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्याविरोधात काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी प्रगट केली. अरविंद सावंत यांच्याकडे बुधवंत आणि जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या तक्रारीही करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिवाय बुधवंत यांना बुलडाणा विधानसभेत उमेदवारी देऊ नका असेही सावंत यांना सांगण्यात आल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले..
लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेची अंतर्गत नाराजी समोर आली होती. काहींनी उध्दव ठाकरे यांना पत्रही लिहिले होते, त्या पत्रात जालिंधर बुधवंत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यासंबंधीचे वृत्त याआधीच "बुलडाणा लाइव्ह" ने प्रकाशित केले होते.
दरम्यान या पार्श्वभूमीवर काल अकोल्यात विभागीय नेते अरविंद सावंत यांनी विधानसभानिहाय बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी, यासाह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर सावंत यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बंद -दाराआड "वन टू वन" चर्चा केली. या चर्चेचा खात्रीशीर तपशील देखील "बुलडाणा लाइव्ह"ला प्राप्त झाला आहे. नरेंद्र खेडेकर आणि बुधवंत यांच्याविरोधात नाराजीचा सुर या चर्चेतून समोर आला. आधी उध्दव ठाकरेंना लिहिलेल्या "त्या" पत्रातील मुद्देही सावंत यांच्यासमोर मांडण्यात आले. बुलडाणा विधानसभेतून बुधवंत यांना उमेदवारी देऊ नका, उमेदवार आयात करावा लागला तरी चालेल अशीही बाजू सावंत यांच्यासमोर मांडण्यात आली..
मेहकर, सिंदखेडराजा बाबत झाली "ही" चर्चा...
दरम्यान यावेळी मेहकर आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी ही सावंत यांची व्यक्तिगत भेट घेतली. मतदारसंघ बांधणी,संभाव्य उमेदवार यावर चर्चा करण्यात आली. मेहकर विधानसभेतून सिद्धार्थ खरात यांच्या नावाचा विचार करता येईल असेही काही पदाधिकाऱ्यांनी सुचवले. सिंदखेडराजा विधानसभेत आपल्याकडे विनिंग उमेदवार नाही त्यामुळे कुणाला आयात करता येईल यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. "साहेब तुम्ही आम्हाला आता जसे विचारताय तसे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस विचारले असते तर लोकसभाही आपण जिंकलो असतो" असेही काही पदाधिकाऱ्यांनी सावंत यांच्या कानावर टाकले.