दुबईत शिवजयंतीचा माहौल..!! अबुधाबीत साजरी झाली शिवजयंती; केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक; दुबईत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी प्रयत्न करणार...
Feb 24, 2025, 17:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आणि समाजासाठी स्फूर्तीदायक आहे. साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक भारतीयाच्या काळजात आहेत.. संकटाला कसे सामोरे जायचे, राष्ट्रहितासाठी कसे जगायचे याचा उत्कृष्ट आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्य खर्ची घातले.. समाजामध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवली असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. दुबईतील अबुधाबी येथे काल,२३ फेब्रुवारीला शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावावरून ना. प्रतापराव जाधव यांनी दुबईतील भारतीयांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशांच्या वतीने २३ फेब्रुवारीला बी. एस. पी हिंदू मंदिरात शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव होते तर अतिथी म्हणून मालोजीराजे शाहू छत्रपती, बीडचे खासदार बजरंग सोनवने यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली इतिहास आहे..अख्खे जग शिवचरित्राकडे आदराने पाहते, आज घडीला सर्वांसाठीच शिवचरित्र हे आदर्शवत आहे..आदर्श राजा, प्रजाहितदक्ष राजा, जाणता राजा म्हणजे काय असते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजेत असेही ते म्हणाले..
दुबईत महाराष्ट्र सदनासाठी प्रयत्न करणार...
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी लोकांना एकत्र येऊन सामाजिक कार्यक्रम करता यावे यासाठी दुबई महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रस्तरावर प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी ना.प्रतापराव जाधव यांनी दिला. कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने दुमदुमून गेला होता...