मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली! डॉ.ऋतुजा चव्हाण यांचा हल्लाबोल; म्हणाल्या,मेहकर - लोणारचा कायापालट करण्यासाठी कटिबध्द....
Nov 12, 2024, 09:31 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर-लोणार मतदार संघातील सामान्य जनतेचा मला मिळणारा प्रतिसाद विजयाची खात्री देणारा आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यानंतर जनमानसात उसळलेली परिवर्तनाची लाट यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता वंचित बहुजन आघाडीवर काहीही आरोप करीत आहेत असा हल्लाबोल मेहकर -लोणार मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केला आहे. महाविकास आघाडी कडून वंचित बहुजन आघाडीवर विविध आरोप केल्या जात आहेत, यावर प्रतिक्रिया देतांना त्या बोलत होत्या..
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडे ही स्पष्ट ध्येयधोरणे नाहीत. सामान्य माणसांचे शोषण करणे हेच महायुती आणि महाविकास आघाडीचे धोरण आहे. त्यांच्या सत्ताकाळात त्यांनी तेच केले.आता लोक दोघानाही कंटाळले असल्याने त्यांना तिसरा सक्षम पर्याय पाहिजे. मेहकरच्या जनतेने एकाच्या कामाचा अनुभव १५ वर्षांत पाहिला आहे. दुसऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तर मेहकर बद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सोबत येण्याचा निर्धार सामान्य जनतेने केल्याचे त्या म्हणाल्या. वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहूनच महाविकास आघाडी वाले काहीही अफवा पसरवत आहेत, मात्र त्यांच्या अफवांना मतदार बळी पडणार नाही असेही डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या..