मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी विविध विकासकामे मंजूर करत आ. संजय रायमुलकरांनी खेचून आणला सर्वाधिक १०९ कोटींचा 
निधी!  

 
मेहकर (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मेहकर लोणार तालुक्यातील विकासकामांच्या बाबतीत मांडणी करत आमदार संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात सर्वाधिक १०९कोटी ७४ लाख रुपये इतका भरीव निधी मेहकर मतदारसंघासाठी मंजूर झाला आहे .
  विधिमंडळ सभागृहात मतदारसंघातील प्रश्न, समस्या जोरकसपणे मांडून संजय रायमूलकर यांनी सभापती, विविध खात्याच्या मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले आणि विविध विकासकामांसाठी अधिकाधिक निधी मंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे. उपविभागीय अधिकारी निवासस्थान , तहसीलदार निवासस्थान आणि महसूल कर्मचारी निवासस्थानांचे बांधकामांसाठी तब्बल ११ कोटी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत .ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन मंजूर होऊन इमारतींचे बांधकाम आणि इतर सोयीसुविधा निर्मिती यासाठी ४४ कोटी ५६ लाख रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाले आहेत .आयुष ,आरोग्य ,कुटुंब कल्याण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून प्रतापराव जाधव यांनी पदभार स्वीकारल्याने उपजिल्हा रुग्णालयासाठी त्यांचीही मोठी मदत होणार आहे .
  आदिवासी दुर्गम भागातील रस्त्यांच्या स्थितीत आणखी बळकटी आणण्यासाठी मारोतीपेठ माळेगाव मेळजानोरी रस्ते सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लाख , याच रस्त्याच्या किलोमीटर ३ ते ८ मधील रस्ते सुधारणा साठी ४ कोटी रुपये तर वाग्देव जोडरस्ता मध्ये सिमेंट पूल उभारणीसाठी २ कोटी , टेंभुरखेड जोड मार्गातील सिमेंट रस्ता बांधकामासाठी दीड कोटी रुपये , शेलगाव देशमुख ते जनुना रस्ता सुधारणा करिता दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत .
 सोनाटी ते गौंढाळा रस्त्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी ३ कोटी , वडाळी ते पारखेड रस्त्यावर मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी ७ कोटी आणि शारा वेणी निजामपूर मौतखेड सोनाटी अकोला ठाकरे रस्त्यातील किलोमीटर १२ ते २८ च्या सुधारणा कामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कोराडी मध्यम प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी २५ कोटी ६८ लाख रुपये नियतव्यव अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे .हा प्रश्न आमदार रायमूलकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाळापासून लावून धरला होता ,हे विशेष घाटबोरी येथे आदिवासी आश्रमशाळेच्या बांधकामासाठी १२ कोटी ७५ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे .मेहकर तालुक्यातील अनेकविध आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थ्यांसाठी या आश्रमशाळेमुळे चांगली शिक्षणाची व निवासाची सोय उपलब्ध होणार आहे .अर्थसंकल्पीय अधिवेशनात मेहकर मतदारसंघासाठी मोठा निधी खेचून आणण्यात आमदार संजय रायमूलकर यांना लक्षणीय यश प्राप्त झाल्याचे दिसून येते .