संग्रामपूर, मोताळा नगरपंचायतीची निवडणूक २१ डिसेंबरला!
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर, मोताळा नगरपंचायतीची निवडणूक २१ डिसेंबरला होऊ घातली आहे. २२ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. त्यामुळे दोन्ही नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली.
राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा श्री. मदान यांनी केली. यात मोताळा, संग्रामपूरचा समावेश आहे. श्री. मदान यांनी सांगितले की, १ ते ७ डिसेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. ४ व ५ डिसेंबरला सुटी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबरला होईल. मतदान २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत चालेल.
२२ डिसेंबरला सकाळी १० पासून मतमोजणी सुरू होईल. राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.