उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संदीप शेळकेंची अर्ज आशीर्वाद यात्रा! जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना पाठवणार उमेदवारी अर्ज; ५०० पेक्षा अधिक गावात शेळकेंच्या विजयासाठी होणार पुजाअर्चा, होमहवन... 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने मतदारसंघात निघालेल्या परिवर्तन रथयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शेळके यांनी ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केली आहे. आता त्याला जोडून एक अनोखा कार्यक्रम वन बुलडाणा मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदारसंघात "अर्ज आशीर्वाद यात्रा" निघणार आहे.
अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी संदीप शेळके यांच्या उमेदवारी अर्जाच्या प्रती जिल्ह्यातील पवित्र धार्मिक स्थळांना पाठवण्यात येणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांत उमेदवारी अर्जाची पालखीतून टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या लढाईत उतरण्यापूर्वी ठिकठिकाणी संदीप शेळके यांच्या विजयासाठी होमहवन, पुजाअर्चा होणार आहे. शेळके यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील धार्मिक शक्तीपीठांना साकडे घालण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जाला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर ३ एप्रिलला संदीप शेळके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.