संदीप शेळकेंची जिल्हावासियांना साद म्हणाले, तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवितो!परिवर्तन रथयात्रेला मेहकर तालुक्यात भरभक्कम प्रतिसाद..
Mar 17, 2024, 15:36 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा मेहकर तालुक्यात सुरू आहे. दरम्यान रथयात्रेला ठिकठिकाणी भरभक्कम प्रतिसाद पाहायला मिळतोय. तुम्ही देत असलेल्या प्रेमाने भारावून गेलो, अशी भावना व्यक्त करत तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवतो. असे प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संस्थापक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले. आज शनिवार ,१७ मार्चच्या सकाळी मेहकर तालुक्यातील चायगाव येथे झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, नव्याने जेव्हा वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा सुरू झाली. तेव्हा प्रस्थापित नेत्यांनी आपल्यावर टीका केली. म्हणाले हा येडा झाला, अशी यात्रा काढून राजकारण होऊ शकते का? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. परंतु आपण करिअर म्हणून नाही, तर विकास घडवून आणण्यासाठी राजकारणात आलो आहे. ठीकठिकाणी वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आजवर ज्यांना आपण निवडून दिल, ते गप्प राहिले. विकासाविषयी कोणी बोललं नाही आणि त्यामुळेच जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचा आरोप संदीप शेळके यांनी केला. आपल्याजवळ सुरुवातीलाच विकासाचे धोरण असल्याने जनतेचा कौल वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला लागून आहे. यामुळे आता जनतेने ठरवलंच तर मी जिल्हा वासियांना आवाज देतो, तुम्ही बदल घडवा मी जिल्हा घडवून दाखवतो अशी ग्वाही शेळके यांनी आपल्या भाषणातून दिली.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, आजवर नेत्यांनी अनेक रस्ते केले असतील पण पांदण रस्त्याचा विचार कोणाच्या मनामध्ये आला नाही. शेत शिवारातल्या सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक जनता शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यातला काही तालुक्यात अजूनही पिक विम्याचे पैसे पोहचले नाही. काही शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आल. सोयाबीन कापसाला भाव नाही. अशी गंभीर स्थिती असताना दिल्ली दरबारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून , यासाठी झगडण्याची आता वेळ आली आहे. जनतेने खासदारकीची संधी दिली तर आपण निश्चितच यासाठी सरकारशी भांडण करू आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना सुरू करू अशी आपली एकंदर भूमिका आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी, तरुणांच्या रोजगारासाठी तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी बनवण्याचा निर्धार आपण केला आहे.
वेळोवेळी आपण विकासाचे व्हिजन मांडत आहोत, ती सगळी संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी जनतेने संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी मला संधी द्यावी, आणि ऐतिहासिक विकासाची प्रचिती घ्यावी असा शब्द समस्त जनतेला संदीप शेळकेंनी दिला. पुढे वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा मोहदरी, वडगाव माळी, सोनाटी, बोरी , उकळी सुकळी या गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली.