यंदाची निवडणूक परिवर्तन घडून आणणार संदीप शेळकेंचे प्रतिपादन! म्हणाले, फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली.. 

परिवर्तन रथयात्रेचा चिखली तालुक्यात झंझावात! 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) प्रस्थापितेचे राजकारण पाहून सामान्य जनता संभ्रमात आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक वैतागले! त्यामुळे यंदाची लोकसभेची निवडणूक परिवर्तन घडवून आणणार असे प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संस्थापक तथा राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले. चिखली तालुक्यातील विविध गावात झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. 
 वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा सध्या चिखली तालुक्यात सुरू आहे. जांब, ढंगारपूर, म्हसला, या गावांमध्ये सकाळी ही यात्रा पोहचली. दरम्यान, यात्रेला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. यादरम्यान ठिकठिकाणीच्या कॉर्नर सभेत जनतेला संबोधित करताना संदीप शेळके म्हणाले, लोकं तोडाफोडीच्या, फोडाफोडीच्या राजकारणात कंटाळले आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रस्थापित पुढाऱ्यांनी कधी विकासाची भाषा केली नाही असा आरोप करत ते म्हणाले की, त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्याला आजही मागासलेपणाचे बिरूद कायम आहे. त्यामुळे जनतेचा कौल परिवर्तनाच्या दिशेने आहे. जनतेने संधी दिल्यास, सर्वप्रथम प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारणार त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आणून त्यावर आपण काम करणार आहोत. शेतपांदन रस्ते हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे तो विषय आपण मार्गी लावणार आहोत. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करून त्यांचा कायापालट करणार, अशा पद्धतीचा सर्वांगीण तसेच शाश्वत विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संदीप शेळके म्हणाले.