संदीप शेळकेंकडे ९५,५४४,६७४ रुपयांची संपत्ती! कर्जाची रक्कमही मोठी! किती कॅश? बँकेत किती जमा? शेती किती? शिक्षण किती? वाचा संदीप शेळके यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात काय लिहिलंय...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी आज ३ एप्रिल ला बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शेळके यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केले. या शपथपत्रात शेळके यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीची त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची, कर्जाची, शिक्षणाची माहिती दिली आहे. संदीप शेळके आणि त्यांच्या पत्नी राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा सौ मालती शेळके यांच्याकडे मिळून ९ कोटी ५५ लाख ४४ हजार ६७४ रुपयांची संपत्ती आहे. संदीप शेळके यांच्याकडे आज ३ एप्रिलच्या तारखेत १ लाख १५ हजार २५० रुपये कॅश स्वरूपात आहेत तर सौ. मालती शेळके यांच्याकडे १लाख २९ हजार ३३० रुपयांची रोकड आहे. संदीप शेळके यांचे बीए पर्यंतचे शिक्षण झाले असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.
                     Advt. 👆
संदीप शेळके यांचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात ५ लाख ८० हजार ७०० रुपये, एचडीएफसी बँक शाखा बुलढाणाच्या खात्यात १ लाख ३६ हजार ३५९, आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात ३४ हजार २३९, पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात १ लाख २७ हजार ३१९ रुपये,भारतीय स्टेट बँक शाखा सुंडरखेड मध्ये १ लाख १४ हजार ६००, आयडीबीआय बँकेच्या खात्यात ८४ हजार ९३८, खामगाव अर्बन बँकेच्या खात्यात ९३६, युनियन बँकेच्या खात्यात ४२ हजार ६००, राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेत ६ लाख ७८ हजार ६४३ रुपये आहेत. याशिवाय संदीप शेळके यांनी आयसीआयसीआय बँक शाखा बुलढाणा मध्ये १० लाख ३८ हजार ६६७ रुपये मुदत ठेवीत गुंतवले आहेत. एचडीएफसी बँक शाखा बुलढाणा मध्ये ५०,०५५, राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्था शाखा सुंदरखेड मध्ये ९६ हजार ५०० व राजर्षी शाहू मल्टीस्टेट मध्ये ५ लाख ४ हजार ९२५ रुपये मुदत ठेवीत गुंतवले आहेत. सौ. मालतीताई शेळके यांनी आयसीआयसीआय बँकेत ५ लाख ४९ हजार ३३३ रुपये मुदत ठेवीत गुंतवले आहेत. स्वतः अध्यक्ष असलेल्या राजर्षी शाहू मल्टीस्टेट मध्ये त्यांनी मुदत ठेव योजनेत ९ लाख ७९ हजार ६३७ रुपये गुंतवले आहेत.
  संदीप शेळके यांची ग्रीन ऍग्रो बाजार एक्सपोर्ट कंपनीत ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. ॲक्टीव्हटॉप फिनटेक कंपनीत १२ लाख ३० हजार व केअर फ्री लॉजिस्टिक कंपनीत ६ लाख ६७ हजार २३० रुपयांची गुंतवणूक केली आहे. एलआयसी पॉलिसी मध्ये १लाख २० हजार, मॅक्स लाईफ इन्शुरन्स मध्ये २ लाख २७ हजार ४५८, टाटा एआयजी इन्शुरन्स मध्ये २६ हजार ५०५ रुपयांची गुंतवणूक शेळके यांनी केली आहे. याशिवाय संदीप शेळके यांनी श्रुगल बिल्डर अँड डेव्हलपर्स ला २७ लाख १५ हजार २५० रुपये कर्ज दिले आहे.
किती गाड्या?
शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार संदीप शेळके यांच्याकडे ३ तर त्यांच्या पत्नी सौ . मालती शेळके यांच्याकडे १ अशा एकूण ४ चारचाकी कार आहेत. त्यात दोन इनोव्हा तर दोन ह्युंदाई कंपनीच्या गाड्या आहेत. 
दागिने किती?
संदीप शेळके यांच्याकडे सोन्याची अंगठी व गोफ असे १ लाख २० हजार रुपयांचे तर सौ. मालतीताई शेळके यांच्याकडे सोन्याची रिंग हार, कानातले, सोन्याचा राणीहार, नेकलेस, मोरनी असे ७ लाख रुपयांचे दागिने आहेत. संदीप शेळके यांच्याकडे १ कोटी ४० लाख ८६ हजार ४१२ रुपयांची तर सौ. मालती शेळके यांच्याकडे ५५ लाख ७ हजार ७८५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ज्यात त्यांच्याकडील रोकड, बँकेतील रक्कम, मुदत ठेवी, शेअर्स, दिलेले कर्ज, दागिने आणि वाहनांचा समावेश आहे.
शेती किती?
संदीप शेळके यांच्याकडे वरवंड शिवारात ३ एकर २० गुंठे शेतजमीन आहे. या शेतजमिनीचे सध्याचे बाजारमूल्य हे एक कोटी ३० लाख रुपये इतके आहे. शिरपूर येथे १८ गुंठे शेतजमीन संदीप शेळके यांच्या नावावर आहे ,त्या जमिनीचे आजचे मूल्य २० लाख रुपये इतके आहे. सौ.मालती शेळके यांच्याकडे केळवद येथे १ एकर १० गुंठे, शिरपूर येथे १ एकर २० गुंठे शेतजमीन आहे. शेळके दांपत्याकडे एकूण ६ एकर २८ गुंठे एवढी शेती आहे. संदीप आचार्य यांच्याकडे व त्यांच्या पत्नी सौ मालती शेळके यांच्याकडे सागवन, सुंदरखेड, येळगाव,पोखरी येथे प्लॉट आहेत. याशिवाय गारखेडा जि. छत्रपती संभाजीनगर मध्ये कल्पतरू अपार्टमेंट मध्ये एक फ्लॅट आहे ज्याची आजची किंमत ७५ लाख रुपये इतकी आहे. संदीप शेळके यांच्याकडे शेती, प्लॉट, फ्लॅट असे मिळून एकूण ५ कोटी ५२ लाख ६५ हजार २ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे तर सौ. मालती शेळके यांच्याकडे २ कोटी ६लाख ८५ हजार ४७५ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून श्री व सौ शेळके ९५५४४६७४ रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत..
कर्ज किती?
संदीप शेळके यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर ॲक्सिस बँक शाखा संभाजी नगरचे २० लाख २४ हजार ४६८ रुपयांचे वाहन कर्ज आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा छत्रपती संभाजी नगरचे १ लाख ६१ हजार ८१६ रुपयांचे वाहन कर्ज शेळके यांच्यावर आहे. याशिवाय ३५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज आहे. असे एकूण संदीप शेळके यांच्यावर ५६ लाख ८६ हजार २८४ रुपये इतके कर्ज आहे. तर सौ.मालती शेळके यांच्यावर राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेचे ६४ लाख ४६९ व वैयक्तिक कर्ज ३० लाख असे एकूण ९४ लाख ४६९ रुपयांची कर्ज असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. संदीप शेळके यांच्यावर बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे.