जानोरी येथील सभेत संदीप शेळके कडाडले! भाऊ, साहेब, ताईंनी जिल्ह्यासाठी केले काय? शेतकऱ्यांच्या समस्यांवर सभागृहात 'मुके' राहणारे हे कसले नेते?? 

म्हणाले खासदारकीची संधी द्या, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू
 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथ यात्रेच्या शेगाव तालुक्यातील जानोरी येथील हाऊस फुल जाहीर सभा संदीप शेळके यांच्या रोखठोक भाषणांनी गाजली! नुसतीच गाजली नाही तर वादळी ठरली अन त्याचे पडसाद संपूर्ण शेगाव तालुक्यात उमटले. जानोरी येथील मुक्कामी सभेत आक्रमकपणे बोलताना संदीपदादांनी शेतकरी, कष्टकरी अन बेरोजगार युवकांच्या व्यथा, वेदना, समस्यांना तोंड फोडतानाच जिल्ह्यातील नेत्यांवर टीकेचा आसूड उगारला.
  १६ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा संपलेल्या या जाहीर सभेत गावकरी, माता भगिनी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शेळके यांनी जिल्ह्याच्या मागासलेपणावर प्रकाश टाकला. कृषी , सांस्कृतिक, अध्यात्मिक, साहित्य, कर्तृत्व यामध्ये कश्याच बाबतीत जिल्हा कमी नाही. मग जिल्ह्याचा विकास का झाला नाही असा सवाल करून ते म्हणाले की मागासलेला जिल्हा म्हणून बुलढाण्याचा उल्लेख होतो तेंव्हा माझ्या मनाला वेदना होतात. यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळी, खास करून आमदार खासदार जवाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. या दीर्घ काळात नेते व भाऊ,साहेब, ताई, दादा, बनलेल्या या नेत्यांनी विकासाकडे सर्रास दुर्लक्ष केले. केवळ रस्ते, नाल्या, सभागृह, पांदन रस्ते म्हणजे विकास नव्हे. मुळात जिल्ह्यातील खासदार व आमदारांकडे परिपूर्ण व आधुनिक विकासाची दृष्टीच नाही. यामुळे जिल्हा परिषद, नगर परिषद, व ग्रामपंचायत यांनी करावयाच्या कामातच ते समाधानी राहतात. जिल्ह्यातील शेतकरी चौफेर संकटात अडकला आहे. खरीप हंगाम उध्वस्त झालाय, रब्बीला अवकाळीचा फटका बसला. मागील वर्षीच्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे, पिकविम्याचे पैसे अजून मिळाले नाहीत. काही मदत मिळाली तर शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यात येते. सिसीआयची कापूस खरेदी सुरू नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. यामुळे जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजाच्या हाल अपेष्ठांना पारावार उरला नाही असे भीषण चित्र असताना जिल्ह्याचे खासदार संसदेत तर आमदार विधानसभेत मूग गिळून बसतात. मौनव्रत धारण करून त्यावर आवाज उठवत नाही हा या शिकांतिकेचा कळस आहे. 
हे चित्र बदलण्यासाठी परिवर्तन ही काळाची गरज ठरली आहे. यामध्ये मला खासदारकीची संधी दिली तर जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व तालुक्यात खासदार संपर्क कार्यालय सुरू करून नियमित जनता दरबार भरवण्यात येईल. यामुळे नागरिकांना त्यांच्या कोणाच्याही कामासाठी जिल्ह्यापर्यंत येण्याची गरज भासणार नाही. आज मी केवळ साधारण कार्यकर्ता असताना शाहू परिवाराच्या माध्यमांने शेकडो युवक युवतींना रोजगार दिला आहे.हजारो बचत गटांना भरघोस मदत करून महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनविले आहे.जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे. खासदार म्हणून जनतेने संधी दिल्यास सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे शेळके म्हणाले. 
७६ वर्षात पिण्याचे पाणी सुद्धा...
देशाला स्वतंत्र मिळून ७६ वर्ष होत आली. या दिर्घ काळात जिल्ह्याचा विकास तर सोडा पण पिण्यासाठी शूद्ध पाणी देखील हे नेतेमंडळी देऊ शकली नाही, अशी घणाघाती टीका शेळके यांनी यावेळी बोलतांना केली. जिल्ह्यातील खारपान पट्टयातील गावांच्या व नागरिकांच्या दुर्दशेवर त्यांनी खंत व्यक्त केली.
७६ वर्षात गावातील हजारो नागरिकांना पिण्यासाठी शुध्द देऊ शकत नाही. असे नेते काय कामाचा असा खडा सवाल त्यांनी केला. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र या नेतेमंडळींनी उध्वस्त केले. तरुणांना रोजगार देणाऱ्या एमआयडीसी कडे त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना कामासाठी महानगरामध्ये जावे लागते. यापेक्षा दुर्दैव ते काय? अशी मनस्वी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुनर्वसन आणि समन्वय केंद्र...
जिल्ह्यातील लाखो नागरिकांशी निगडित पुनर्वसनाच्या गंभीर समस्येकडेही संदीप दादांनी यावेळी लक्ष वेधले. दीर्घ काळ रेंगाळलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पाच्या पुनर्वसन, भूसंपादन च्या धिम्या गतीबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखविली. जिल्ह्याच्या टोकावरील तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांना कामे करून घेण्यासाठी जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाण्यात जावे लागते यासाठी हातातील कामे, मजुरी, शेतीची कामे सोडून व आर्थिक भुर्दंड सहन करून हजारो प्रकल्प ग्रस्तांना जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागते. तिथे गेल्यावरही कामे होत नसल्याने रिकाम्या हाती त्यांना गावी परतावे लागते. आपण खासदार झालो तर यासर्व कामांसाठी तालुक्यातच समन्वय केंद्र स्थापन करणार असे वचन त्यांनी दिले.
दिसला ग बाई दिसला...
जाणोरी येथील सभेत संदीप शेळके यांचा रुद्रावतार दिसून आला.जिल्ह्यातील निष्क्रिय नेतेमंडळींना त्यांनी आडव्या हातानी त्यांचा सामाचार घेतला. प्रामुख्याने खासदारांवर त्यांनी टीकेची तोफ डागली. त्यांनी काय विकास केला? ते त्यांनाच ठाऊक! पण कामे तर सोडा ते लाखो मतदारांना भेटायला, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला, त्यांना दिलासा द्यायला देखील त्यांना सवड नाही.त्यामुळे नशिबाने ते कुठे दिसले, त्यांचे दर्शन झाले की जिल्हावासी गमतीने मनातल्या मनात "दिसला ग बाई दिसला" हे सुप्रसिद्ध गाणे गुणगुणतात, असा टोला शेळकेंनी लगावला.