महायुतीच्या खामगावातील महासभेला रेकॉर्डब्रेक गर्दी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजच्या गर्दीने प्रतापरावांच्या चौकारावर शिक्कामोर्तब!देवेंद्र फडणविसांचे भाषणही वादळी!

प्रतापराव जाधव रेकॉर्ड मतांनी विजयी होतील म्हणाले; विरोधकांना धो धो धुतले! बातमीत पहा सभेचे खास फोटो..
 
खामगाव(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): आजच्या गर्दीने प्रतापराव जाधव यांच्या चौकारावर शिक्कामोर्तब केले आहे. आजच्या सभेने सगळ्यांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत प्रतापरावांना मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा.प्रतापराव जाधव यांचे अभिनंदन केले. आज,२३ एप्रिलच्या सायंकाळी खामगाव शहरात खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ महायुतीची महासभा पार पडली, या सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, आ. डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.संजय कुटे,आ. आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले, आम संजय गायकवाड यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 Advt.👆
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी याच मैदानावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या उध्दव ठाकरेंच्या सभेची टिंगल त्यांनी उडवली, त्या सभेत मारामाऱ्या झाल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत ते केवळ संपत्तीचे वारसदार आहेत असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. आम्ही जनतेच्या मनातल सरकार स्थापन केलं , त्यांचा वारसा सांगणाऱ्यानी आरसा पहावा, त्यांनी मारलेल्या कोलांट उड्यांमुळे आरस्याला देखील लाज वाटेल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.अबकी बार ४०० पार आणि प्रतापरावांचा चौकार निश्चित आहे, असे म्हणत भाषणाच्या शेवटी त्यांनी प्रतापराव जाधव यांचे अग्रिम अभिनंदन केले.
छायाचित्र सौजन्य: गणेश धुंदाळे
 आमचे पॉवरफूल इंजिन: देवेंद्र फडणवीस 
  यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे भाषण चांगलेच वादळी अन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारे ठरले. भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांचा उल्लेख करीत असतानाच त्यांनी खा.जाधव यांचा उल्लेख चौथ्यांदा दिल्लीला जाणारे असा केला यावेळी गर्दीतून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की खामगावची सभा पाहिल्यावर कुणाच्याच मनात कोणतीही शंका राहिली नाही. खासदार प्रतापराव जाधव रेकॉर्ड मताने विजयी होईल असे भाकीत त्यांनी केले. ही निवडणूक साधी निवडणूक नाही, देशाचा नेता कोण असेल, पुढची ५ वर्षे देश कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. एका बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मजबूत एनडीए आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधीच्या नेतृत्वात २६ पक्ष एकत्र आले आहे. सबका साथ साथ विकास या तत्वावर नरेंद्र मोदी देश पुढे घेऊन जात आहे. महायुतीचे इंजिन मजबूत आहे, त्याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बोगी आहे, अजित दादांच्या राष्ट्रवादीची बोगी आहे, राज ठाकरेंच्या मनसेची बोगी आहे मात्र दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या इंजिनला कुणी बोगी लावायला तयार नाही.तिकडे प्रत्येकाला इजिन व्हायचं आहे आणि इंजिंनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते असे फडणवीस म्हणाले.
 
 
उध्दव ठाकरेंच्या इंजिन मध्ये एकनाथ शिंदेंना जागा नाही ,जागा फक्त आदित्य ठाकरेंना आहे असे म्हणत त्यांनी परिवारवादावर हल्लाबोल चढवला. रामाच्या हातात धनुष्यबाण, एकनाथ शिंदेच्या हातात धनुष्यबाण, प्रतापराव जाधवांच्या हातात धनुष्यबाण, या मतदारसंघात मोदींच्या हातात धनुष्यबाण, म्हणून धनुष्यबाणाला दिलेलं मत मोदींना जाणार आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचला. समाजातील असा कोणताही घटक नाही ज्यांना मोदींनी आणलेल्या योजनांचा लाभ मिळाला नाही . आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार कोटी रुपये थेट जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, २०१४ आधी आपण अकराव्या क्रमांकावर होतो, लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहचवणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
खामगाव जालना रेल्वेमार्गाची फाईल उध्दव ठाकरेंच्य टेबलवर अडीच वर्ष पडून होती. त्यांनी ५० टक्के निधी मंजूर केला नाही. अडीच वर्षात एकाही रेल्वेमार्गासाठी निधी त्यांनी दिला नाही.एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारने त्यासाठी २४५६ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणाले. २२० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना संतनगरी शेगावसाठी होणार आहे. नदीजोड प्रकल्प विदर्भाला समृध्द करणार आहे. जिगाव प्रकल्पासाठी ७४०० कोटी रुपये दिले असल्याचेही ते म्हणाले. १० हजार ३०० कोटी रुपयांचे केंद्राचे प्रकल्प बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहेत. ही निवडणूक देशाचे चित्र बदलणारी निवडणूक आहे. १० वर्षात जे काम केलं ते केवळ ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी है असेही फडणवीस म्हणाले. २६ तारखेला प्रतापराव जाधव यांना मतदान करून दिल्लीला पाठवा असे आवाहन फडणवीस यांनी शेवटी केले.