जनसेवेच्या नव्या जबाबदारीसाठी सज्ज! ना.आकाश फुंडकरांची भावुक फेसबुक पोस्ट; म्हणाले, भाऊसाहेबांची आठवण....
Dec 16, 2024, 11:46 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सलग तिसऱ्यांदा खामगाव विधानसभा मतदारसंघातून विजयश्री खेचून आणणाऱ्या ॲड.आकाश फुंडकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले. कुणाच्याही काड्या न करता सर्वांना सोबत घेऊन केलेले आकसविरहित राजकारण आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळवून गेले. स्व.भाऊसाहेबांनी स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.प्रमोद महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून भाजपा ग्रामीण भागात पोहोचवली, ती पुण्याई देखील आता आकाश फुंडकरांच्या कामी आली. दरम्यान मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ना.आकाश फुंडकर भावूक झालेले दिसले. आज, त्यांनी फेसबुक पोस्ट करीत भावनांना मोकळी वाट करून दिली. "मंत्री पदाची शपथ घेताना माझ्या मनात भाऊ साहेबांची आठवण आली' असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे. "जनसेवेच्या नव्या जबाबदारी साठी सज्ज" या मथळ्याखाली ना.आकाश फुंडकर यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
अशी आहे ना.आकाश फुंडकर यांची फेसबुक पोस्ट...
काल मंत्रीपदाची शपथ घेताना माझ्या मनात भाऊसाहेबांची आठवण आली. भाऊसाहेबांनी आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मोठे स्वप्न पाहिले होते आणि त्या दिशेने निःस्वार्थपणे काम केले होते. मला आज त्यांच्या त्या स्वप्नांना पुढे नेण्याची संधी मिळाली आहे, याचा मला अभिमान आहे. भाऊसाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यातून मला प्रेरणा मिळाली आहे, आणि त्यांच्यासारखेच निस्वार्थपणे जनतेसाठी काम करणे, ही माझी प्राथमिकता असेल.
या संधीसाठी मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृह मंत्री अमित शाहजी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, नितीन गडकरीजी, तसेच आपल्या राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि भाजपचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मी विश्वास देतो की भाऊसाहेबांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी मी कधीही मागे हटणार नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आपल्या प्रदेशाच्या प्रगतीसाठी झोकून देईन.